पुणे -महापालिकेकडून शहराच्या वेगवेगळ्या भागात व्यावसायिकांसाठी लहान आकाराचे व्यापारी गाळे तयार केलेले आहेत. जवळपास 500 पेक्षा अधिक गाळे धूळखात पडून असल्याने त्यांच्या देखभाल दुरूस्तीवरच मोठा खर्च होत आहे. अनेक गाळे वापरात नसल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे, हे गाळे वापरात आणण्यासाठी महापालिकेच्या बचतगटांना देण्यात येणार आहेत. यासाठीचा प्रस्ताव समाज विकास विभागाकडून मालमत्ता व्यवस्थापन विभागास दिला जाणार असल्याचे पालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी सांगितले.
दोघांचा होणार फायदा
महापालिचे हे गाळे केवळ भाडे जास्त असल्याने तसेच आवश्यक सुविधा नसल्याने बंद आहेत. वापराविना असलेल्या या गाळ्यांचा महापालिकेस काहीच फायदा नाही. उलट दरवर्षी देखभाल दुरूस्तीसाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. हेच गाळे बचतगटांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्यास त्याचा वापर होईल तसेच यातून पालिकेस उत्पन्न मिळेल. बचतगटांनाही आपली उत्पादने विकण्यासाठी हक्काची जागा मिळेल.
500 पेक्षा अधिक गाळे पडून
शहराच्या विविध भागात महापालिकेचे 500 पेक्षा अधिक गाळे पडून आहेत. प्रामुख्याने शहराच्या उड्डाणपुलालगत, भुयारी मार्ग तसेच इतर काही प्रकल्पांच्या ठिकाणी हे गाळे आहेत. पूर्वी महापालिका हे गाळे नाममात्र दराने देत असे. मात्र, 2008च्या नवीन जागा वाटप नियमावलीनुसार, पालिकेच्या जागा रेडीरेकनरच्या दराने दिल्या जातात. शहरात जागांचे भाव गगनाला भिडल्याने या गाळ्यांचे भाडे परवडत नाही. त्यामुळे, पालिका केवळ निविदा काढत राहते. गाळे तसेच पडून राहतात. बचतगटांसोबत महापालिकेचा संयुक्त प्रकल्प राबवून हे गाळे त्यांना सवलतीच्या दरात देणे शक्य होणार आहे.