पुणे – स्व. अभिनेते देव आनंद यांचा जन्मशताब्दी सोहळा पुण्यात “भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालया’त (एनएफएआय) साजरा होणार असून, दि. सप्टेंबर रोजी “राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळा’तर्फे (एनएफडीसी) त्याचे आयोजन केले जाणार आहे. या निमित्त देव आनंद यांचे गाजलेले सात चित्रपट दाखवले जाणार आहेत.
देव आनंद यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या 100व्या जयंती निमित्त त्यांचे चार सर्वोत्तम चित्रपट “फोरके रिझोल्यूशन’ मध्ये एनएफडीसी-एनएफएआयने, पुनर्संचयित केले आहेत. राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियाना अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या चित्रपटांच्या जतनासाठी निधी दिला आहे. “गाईड’, “ज्वेल थीफ’, आणि “जॉनी मेरा नाम’चे 35 मिमी आणि सीआयडीचे 35 मिमी “डुप निगेटिव्ह’चे अत्याधुनिक अर्काइव्हल फिल्म स्कॅनरवर “फोरके रिझोल्यूशन’मध्ये स्कॅन केले गेले आहे.
संबंधित चित्रपट एनएफडीसी-एनएफएआयमधे तापमान आणि सापेक्ष आर्द्रता नियंत्रित वातावरणात अनेक दशकांपासून जतन केले गेले आहेत. या सोहळ्याच्या माध्यमातून, देव आनंद यांच्या कारकिर्दीची नव्या पिढीला ओळख करून देणे आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करणाऱ्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा एनएफडीसी-एनएफएआयचा मानस आहे.
चित्रपटांचे रिळांचे जतन…
देव आनंद यांच्या चित्रपटाच्या रिळ जतन-संवर्धनावर एनएफडीसी-एनएफएआय काम करीत आहे. कालौघात यावर साचलेली धूळ, घाण, चरा किंवा तडा, छिद्र, ओरखडे आदी डिजिटल पद्धतीचा वापर करून ते दूर केले आहेत. “बाजी’, “सीआयडी’, “असली नकली’, “तेरे घर के सामने’, “गाईड’, “ज्वेलथीफ’, “जॉनी मेरा नाम’ या चित्रपटांचे सादरीकरण होणार असून हे सर्वांसाठी खुले आहे. याशिवाय पुनर्संचयित केलेले चित्रपट 23 ते 24 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात “पीव्हीआर’ आणि “आयनॉक्स’मध्येही प्रदर्शित केले जाणार आहेत.