दरोडा प्रतिबंधक व चोरी प्रतिबंधक पथक पुन्हा कार्यरत
पुणे – तत्कालीन पोलीस आयुक्तांनी बंद केलेले दरोडा प्रतिबंधक विभाग व वाहन चोरी प्रतिबंधक पथक पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हे शाखेची पुर्नरचना केली आहे. तसेच, खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथक स्वतंत्र केले आहे. गुन्हे शाखेच्या पुनर्रचनेचे आदेश पोलिस आयुक्त गुप्ता यांनी काढले आहेत.
दरम्यान, तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् यांनी शहर गुन्हे शाखेची पुनर्रचना करून काही पथके बंद केली होती. तर काही पथकांना केवळ नामधारीच ठेवले होते.
तसेच, खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथक एकत्र करून त्याचे दोन विभाग तयार केले होते. गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठी कडक पावले उचलण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्याचे आदेश त्यांनी काढले.
गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त यांच्या अधिपत्याखाली गुन्हे शाखा व आर्थिक व सायबर गुन्हे शाखा हे उपायुक्त काम करतील. गुन्हे शाखेचे दोन सहायक पोलीस आयुक्त आणि आर्थिक व सायबर शाखेचा एक सहायक पोलीस आयुक्त राहणार आहे.