प्लॅस्टिकची पिशवी मागितल्याने ग्राहकाचा खून

भाजी विक्रेत्याचे कृत्य : परिसरात खळबळ

पुणे – धनकवडी येथे भाजीविक्रेत्याने नातेवाईकांच्या मदतीने एकाचा धारदार शस्त्रांनी वार करून खून केला. धनकवडीतील शेवटच्या बस थांब्याजवळ शुक्रवारी रात्री ही घटना घडली. केवळ प्लॅस्टिक पिशवीच्या वादातून हा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

रामदास शामराव शिळीमकर (रा. आईमाता फरसाण, दुकानासमोर आंबेगाव) असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी ज्ञानेश्‍वर वानखेडे त्याचा भाऊ आणि मेहुण्यावर गुन्हा दाखल केला आहे.

शिळीमकर हे बांधकामाचे छोटे-मोठे ठेके घेत होते. तर वानखेडेचा पदपथावर भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. शिळीमकर आणि वानखेडे हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. मागील आठ-नऊ वर्षांपासून शिळीमकर वानखेडेकडून भाजी घेतात. शुक्रवारीही त्यांनी वानखेडेकडे प्लॅस्टिक पिशवी मागितली. यातून त्यांच्यामध्ये वाद झाला. यानंतर शिळीमकर तेथून निघून गेले. दरम्यान, शिळीमकर त्यांच्या मित्रांसह धनकवडी येथील शेवटच्या बसथांब्याजवळ रात्री अकराच्या सुमारास गप्पा मारत होते. यावेळी वानखेडे, त्याचा भाऊ आणि मेहुणा तेथे आले. त्यांनी शिळीमकरशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर ज्ञानेश्‍वर वानखेडेने चाकूने शिळीमकर याच्या पोट, छाती आणि हातावर वार केले. यानंतर ते तेथून पळून गेले. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी शिळीमकर यांना रुग्णालयात दाखल केले. शिळीमकर यांचा उपचारादरम्यान शनिवारी पहाटे मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.