कोपरगावात शेतकऱ्यांसाठी पीकविमा मदत केंद्र

कोपरगाव – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक तालुक्‍यात मदत केंद्र उभारून शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली. या भूमिकेचा आदर करीत कोपरगाव येथे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते मदत केंद्र सुरू करण्यात आले.

यासाठी जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, शिवसेना नेते नितीन औताडे, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सपना मोरे, भरत मोरे, प्रफुल्ल शिंगाडे, मदत केंद्रप्रमुख किरण खर्डे, अशोक कानडे, रावसाहेब थोरात, चंदू भिंगारे, कलविंदर दडियाल, बाळासाहेब जाधव आदिंनी पुढाकार घेऊन, प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी सेनेकडून प्रत्येक गावात जाऊन, शासन बॅंका व शेतकरी विमा कंपनी यांचा दुवा म्हणून मदत केली जाणार आहे.

शेतकरी अशोक डुबे यांचा अर्ज भरून घेत तहसीलदार चंद्रे यांनी या मदत केंद्राची सुरूवात केली. यावेळी तहसीलदार चंद्रे यांनी ग्रामीण भागात आजही शेतकऱ्यांना पीकविमा मिळवण्यामध्ये अडचणी आहेत. या योजनेला सहकार्य करून, अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे म्हणाले, केंद्र व राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना खरीप रब्बी व उन्हाळी हंगामातही कोणतेही शाश्वत पीक फायदेशीर ठरेल हे सांगता येत नाही. नैसर्गिक संकटाला सामोरे जाताना पिकास विमा संरक्षण असावं, या भूमिकेतील पिक विमा योजना व योजनेच्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना हप्ता भरूनही विमा मिळत नसल्याने, प्रत्येक शिवसैनिकाने शेतकऱ्यांचा मदतनीस म्हणून त्यांच्या प्रत्येक प्रश्नात सहभागी व्हावे, अशा भूमिकेतून भविष्यात काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कोणत्याही अडचणीला या मदत केंद्रातून मदत केली जाणार असल्याचे सांगितले. उपजिल्हाप्रमुख सपना मोरे यांनी महिला शेतकऱ्यांनाही महिला आघाडीच्या माध्यमातून मदत करणार असल्याची माहिती दिली. शिवसेनेची भूमिका सुरुवातीपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष करण्याची राहिली आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांनीही याच प्रश्नांसाठी भविष्यात संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्याची जबाबदारी खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे पक्षाने दिली आहे. 23 जून ला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे श्रीरामपूर येथे या मदत केंद्राच्या आरंभासाठी येणार आहेत, अशी माहिती जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.