शिवेंद्रसिंहराजेंच्या भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत

साताऱ्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत आग्रह; दोन दिवसांत मोठी उलथापालथ

सातारा – सातारा जावळीचे विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाचा एकमुखी सूर सुरूची येथे झालेल्या बैठकीत सोमवारी उमटला. विधानसभेच्या तयारीपेक्षा बाबाराजेंनी भाजप प्रवेश करावा, या एकाच मुद्यावर दीड तास खलं झाला. शिवेंद्रसिंहराजे यांनी साताऱ्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. मात्र, भाजप प्रवेशावर सूचक मौन बाळगले. मंगळवारी जावळी तालुक्‍यातील कार्यकर्त्याची बैठक व बुधवारी अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखान्यावर होणारी राजकीय आखाडी यामुळे सातारा शहरात येत्या दोन दिवसांत मोठी राजकीय उलथाबाबत होण्याची जोरदार चर्चा आहे. सातारा शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची आज आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

यावेळी नगर विकास आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य हेमंत कासार, प्रकाश बडेकर, पक्षप्रतोद अमोल मोहिते, अशोक मोने, प्रकाश गवळी, माजी उपाध्यक्ष जयेंद्र चव्हाण, जयवंत भोसले ऍड. दिलावर मुल्ला आदी यावेळी उपस्थित होते. बैठकीत भाजप प्रवेशाचा सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कार्यकर्त्यांच्या विचाराचाच निर्णय घेतला जाणार असल्याचे सूचक वक्तव्य केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाचा योग्य सन्मान केला नाही. तीन विधानसभा मतदारसंघात प्रभावक्षेत्र असताना वेळोवेळी अडचणी वाढवण्यात आल्या आणि त्यांनी धोका दिला, ते विधानसभा निवडणुकांमध्ये किती विश्‍वासाने काम करतील याची खात्री नसल्याची सामूहिक तक्रार करण्यात आली.

नगरपालिका निवडणुकीपासून दोन्ही राजांच्यात वितुष्ट आले होते. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोन्ही राजांची मनधरणी केल्याने दोन्ही राजांच्यात लोकसभेला मनोमिलन झाले. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी निवडणुकीत खा. उदयनराजे भोसले यांचे काम केले आणि सातारा- जावळीतून मताधिक्‍य मिळवून दिले, मात्र काही महिन्यांपासून आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्याविरोधात षड्‌यंत्र सुरु असून खासदार आपल्या विरोधात काम करणार असल्याचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांना समजल्याने त्यांनी याबाबत वारंवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर या गोष्टी घातल्या, तरीही हे प्रकार सुरूच असून आपल्या आमदारकीला दगाफटका होईल. यामुळे सध्या आ. शिवेंद्रराजे पक्षावर नाराज आहेत. त्यांनी पक्षाकडे इच्छुक उमेदवारी अर्जही भरलेला नाही तर इच्छुकांच्या मुलाखती सुरु असताना अजित पवार यांची भेट नाकारली. त्यामुळे आ. शिवेंद्रराजे राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चा जोरात पसरु लागल्या.

आ. शिवेंद्रराजे कोणताही निर्णय घेताना आपल्या कार्यकर्त्यांना नेहमीच विचारात घेतात आणि त्यांच्या हिताचाच निर्णय नेहमी घेतात. त्यामुळे सोमवारी त्यांनी अचानक सातारा शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने आ. शिवेंद्रराजे भोसले कार्यकर्त्यांचे ऐकणार की पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या शब्दाचा मान राखणार हे येणारा काळच ठरवेल. पण आ. शिवेंद्रराजे भोसले यांचा कार्यकार्त्यांच्या बाजूचा कल असल्याने लवकरच राष्ट्रवादीला मोठा फटका सातारा जिल्ह्यात बसणार आहे.

आ. शिवेंद्रराजे यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीच्या तीन आमदारांना त्याचा फटका बसणार आहे. तर अनेक सत्तास्थानांतून राष्ट्रवादी पक्ष पायउतार होऊ शकतो. त्यामुळेच या नेत्याला गमवायचे नाही याकरता राष्ट्रवादी पक्षाने देव पाण्यात घातले
आहेत.

काय म्हणाले शिवेंद्रराजे
आजची पिढी सोशल मीडियामुळे प्रचंड गतिमान आहे. जर मतदारसंघात मोठी कामे झाली नाही तर मतदान होणार नाही. केवळ आमदार या नात्याने मोठ्या प्रकल्पांचा पाठपुरावा करताना प्रचंड मर्यादा येतात. माझे शरद पवार व अजितदादा पवार यांच्याशी कोणतेही वाद नाहीत. सातारा मतदारसंघात मोठे विकास प्रकल्प व्हावेत, ही आमची धारणा आहे. ज्या पक्षात माझ्या कार्यकर्त्यांचा विचार होईल किंवा त्याचे हित पाहिले जाईल त्याच पक्षात मी असेन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे, असे सूचक विधान शिवेंद्रसिंहराजे यांनी केले. मग ती चर्चा विकास कामांची होती की भाजप प्रवेशाची याला मात्र राजकीय दुजोरा मिळाला नाही. मात्र, भाजपमध्ये जाण्याचे स्पष्ट संकेत शिवेंद्रसिंहराजे यांनी दिल्याचा दावा नगर विकास आघाडी पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्यांनी केला. सातारा व जावळी या दोन तालुक्‍यांतील प्रमुख सदस्यांची बैठक मंगळवारी दुपारी दोन वाजता सुरूची येथे होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अजिंक्‍यतारा कारखान्यावर आखाडीच्या निमित्ताने बुधवारी 31 रोजी जोरदार राजकीय घडामोडी घडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.