“बा रायगड’ परिवाराचा पुढाकार
दावडी (वार्ताहर) – पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाफगाव येथील पुरातन राजेश्वर मंदिर परिसरात “बा रायगड’ परिवाराच्या वतीने साफसफाई करण्यात आली. यावेळी बा रायगड परिवाराच्या वतीने सर्वप्रथम मंदिरात पूजा करण्यात आली. पाणी आणि दूधाने राजेश्वरचा अभिषेक करण्यात आला. तसेच गंध, पुष्प, धूप, दीप व नैवेद्य अर्पण करण्यात आला.
देवाची आरती करण्यात आली. यानंतर वास्तूपूजा करून ओळख परेड झाल्यावर कामाचा आढावा घेऊन टीम बनवून साफसफाईच्या कामाला सुरुवात झाली. या मोहिमेत बा रायगड परिवाराचे विरेश नांगरे, महेश भुजबळ, निलेश ओहोळ, आयशा आस्मा ताई, ज्ञानेश्वरी भुजबळ, गौरीताई भूमकर, वनिता भोसले, अमोल देशमुख, सौरभ चव्हाण, तुषार घाडगे, राजू बिरादार, विशाल पाचारणे, सह्याद्री भुजबळ यांच्या सह अनेक सदस्य सहभागी होते.
यावेळी राजेश्वर मंदिराच्या उत्तरेच्या कठड्यावर असलेले मातीचे ढीग तटबंदीवर वाढलेली झुडपे व गवत मंदिराच्या कळसावरील कचरा, झाडे, झुडपे काढण्यात आली. मंदिर परिसरात साफसफाई व स्वच्छता करण्यात आली. तसेच मंदिरावर आलेल्या मोठमोठया फांद्या कापण्यात आल्या. या कामासाठी वाफगावचे आजी, माजी सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी घंटागाडीची व इतर लागणाऱ्या साहित्याची मोलाची मदत केली. सर्व ग्रामस्थांनी “बा रायगड’ परिवाराचे आभार मानले. या मंदिराच्या डागडुजीसाठी पुढील काळात “बा’ रायगड परिवाराच्या वतीने मोहिम हाती घेण्यात येणार असल्याचे विरेश नांगरे यांनी सांगितले.