पेठांमधील प्रकार : दीर्घकालीन लॉकडाऊनला कंटेन्मेंट झोनमधील नागरिक वैतागले
पुणे – शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात बंद केलेल्या रस्त्यांवरून जाऊ द्यावे, या मागणीसाठी नागरिक आणि पोलिसांमध्ये खडाजंगी होत असल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. शहरातील इतरत्र सर्वच रस्ते आणि व्यवहार खुले झाल्याने नागरिक बाहेर पडत आहेत. वाहनांची संख्याही नेहमीप्रमाणेच रस्त्यावर दिसत आहेत. पेठांमध्ये बहुंतांश होलसेल वस्तूंची बाजारपेठ वसली आहे. ती सध्या बंद असली तरी कंटेन्मेंट झोनमधील नागरिक दिर्घकालीन लॉकडाऊनला वैतागले आहे. यामुळे तेही बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत.
पुणे शहराच्या मध्यपूर्व भागातील पेठांमध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले होते. त्यामुळे लॉकडाऊन काळात या भागातील नागरिकांनी घराबाहेर पडून गर्दी करू नये, यासाठी पेठांतर्गत रस्ते ठिकठिकाणी बॅरिकेड, बांबू, पत्रे लावून बंद केले होते. दरम्यान, लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागांत दुकाने तसेच कार्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे आता प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना घराबाहेर पडावे लागत आहे. दरम्यान, प्रतिबंधित भागात रस्ते अद्याप बंद असल्याने नोकरी तसेच इतर महत्त्वाच्या कामानिमित्त वाहन घेवून बाहेर पडण्यात त्यांना अडथळे येत आहे.
बुधवारी दुपारी कसबा पेठेतून शिवाजी रस्त्यावर येणाऱ्या गल्लीतील बंद केलेला रस्ता खुला करावा, यासाठी वाहनचालक आणि पोलिसांमध्ये किरकोळ वाद झाले. यावेळी काही नागरिकांनी स्वत: बांबू काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना विरोध केला. यावेळी दुचाकीवर असलेले वाहनचालक बराच वेळ बंद केलेल्या रस्त्याजवळ आम्हाला शिवाजी रस्त्यावर येवू द्या, तसेच शिवाजी रस्त्यावरून कसबा पेठ भागात जावू द्यावे, या मागणीसाठी अडून बसले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना वाहतुकीस परवानगी नाही, असे कारण देत तेथून जाण्यास सांगितले.
मध्यमधून पूर्व भागात जाण्यास अडचणी
पेठांतर्गत रस्ते सुमारे दोन ते अडीच महिन्यांपासून वाहतुकीस बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना मध्य पुण्यातून पुणे शहराच्या पूर्व भागात पुणे स्टेशन, ससून हॉस्पिटल, नाना पेठ, कॅम्प आदी भागांत जाण्यास अडचणी येत आहेत. यासोबतच स्थानिकांनाही आता त्रासास सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पुणे शहरात कारोना प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने दिसून येत आहे.