सातारा – राजकीयदृष्टया मरगळलेल्या सातारा जिल्हा कॉंग्रेसला सोमवारी पुन्हा एकदा धक्का बसला. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र झुटिंग यांनी राजीनामा दिल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हा राजीनामा वैयक्तिक कारणास्तव दिल्याचे झुटिंग यांनी सांगितले. हा राजीनामा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पाठवण्यात आला आहे.
रवींद्र झुटिंग गेल्या एकोणीस वर्षापासून युवक कॉंग्रेसमध्ये सक्रिय आहेत. जिल्हा कॉंग्रेसकडून राबविल्या जाणाऱ्या प्रत्येक उपक्रमात झुटिंग यांनी हिरीरीने भाग घेत तत्कालीन जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांना कायमच समर्थन दिले. मात्र, गेल्या दोन वर्षात राजकीयदृष्टया कॉंग्रेसला खंबीर चेहराच न उरल्याने पक्षाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. आधी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा राजीनामा, नंतर जयकुमार गोरे यांचा भाजप प्रवेश, आमदार आनंदराव पाटील यांनी अंर्तगत वादातून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी घेतलेली फारकत यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज होणारी कॉंग्रेस कराड दक्षिणचा अपवाद वगळता अगदीच गलितगात्र झाली आहे.
तब्बल दोन दशके कॉंग्रेसचे कट्टर सदस्य असलेल्या सातारा शहराध्यक्ष रवींद्र झुटिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना सोमवारी पाठवून दिला. झुटिंग 2000- 2009 या नऊ वर्षात कॉंग्रेससह सातारा शहरातील अनेक सामाजिक संघटनांमधून सक्रिय होते. माजी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मनोमिलनाच्या पहिल्या टप्प्यात झुटिंग सातारा विकास आघाडीकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
त्यावेळी त्यांनी नियोजन सभापती म्हणून जवाबदारीसुध्दा पार पाडली होती. मात्र, कॉंग्रेसच्या जाहीर कार्यक्रमांमधून झुटिंग यांनी आपली उपस्थिती कमी केली होती. जिल्हा कॉंग्रेसला अध्यक्ष नसल्याने चेहराच राहिलेला नाही. त्यामुळे रवींद्र झुटिंग यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. मी माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे राजीनामा देत असल्याचे झुटिंग यांनी स्पष्ट केले. तसेच पुढे काय करणार याबाबतही निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.