किर्ती नलावडे; कोरेगाव मतदारसंघात राबवणार मतदार जागृती कार्यक्रम
कोरेगाव – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदान व निवडणूकविषयक जागृती व्हावी, या हेतूने शाळा- महाविद्यालयांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. तसे निर्देश मतदारसंघातील सर्व शाळा- महाविद्यालयांना देण्यात आले आहेत, अशी माहिती कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती किर्ती नलावडे यांनी दिली.
या कार्यक्रमांतर्गत नववी ते बारावीच्या वर्गांमध्ये मतदार साक्षरता क्लब स्थापन करण्यात आले आहेत. त्याद्वारे जागृती करण्यात येत आहे.
मतदार जागृती कार्यक्रम पूर्ण क्षमतेने राबवण्यात येणार असून सर्व उपक्रमांना नागरिक, शाळा, महाविद्यालय, प्राचार्य, मुख्याध्यापक या सर्वच घटकांनी पूर्णपणे सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती नलावडे यांनी केले. मतदानापर्यंत म्हणजेच 21 ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांचा सहभाग असलेले विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये प्रभात फेरी तसेच शाळास्तरावर निबंध, रांगोळी, चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
प्रतिज्ञापत्र, मानवी साखळी, पथनाट्य सादर केली जाणार आहेत. पत्रलेखन उपक्रमांतर्गत आई- बाबांना पत्र लिहिले जाणार आहे. चर्चासत्र, सायकल फेरी, फ्लेक्स लावणे हे उपक्रम घेण्यात येणार आहेत. या सर्व उपक्रमातून शाळा- महाविद्यालयांच्या माध्यमातून सामान्य मतदारांमध्ये मतदानविषयक जागृती करण्याचा हेतू आहे, असे श्रीमती नलावडे म्हणाल्या. निवडणुका हा लोकशाहीचा पवित्र उत्सव असून त्यामध्ये सर्वच घटकांनी सामील होणे गरजेचे आहे.
समाजातील सर्व घटकांमध्ये याबाबत जागृती करण्यासाठी शाळा- महाविद्यालये प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून ही जागृती करण्यात येणार आहे, असे श्रीमती नलावडे यांनी सांगितले. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव, सातारा आणि खटाव तालुक्यातील सर्व शाळांना हे निर्देश देण्यात आले आहेत.