आचारसंहितेचा भंग झाल्यास गुन्हे दाखल करा

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे अधिकाऱ्यांना आदेश


आदर्श आचारसंहितेचे गांभीर्य प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे

पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली असून या आचारसंहितेचे सर्व विभाग प्रमुखांनी काटेकोरपणे पालन करीत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. आचारसंहितेचा भंग झाल्यास तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सोमवारी सर्व विभागप्रमुख, नोडल अधिकारी, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, रेल्वे, बॅंकांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी राम बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांच्यासह सहायक निवडणूक अधिकारी व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राम म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आदर्श आचारसंहितेचे गांभीर्य प्रत्येकाने समजून घेण्याकरीता आचारसंहितेचा सखोल अभ्यास करावा. अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील माहिती जाणून घ्यावी. निवडणूक आयोगाने दिलेल्या विविध सुविधा व सूचनांचेही प्रत्येकाने पालन करून ही निवडणूक सर्वांनी एकत्रित मिळून शांततेत पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले.

विधानसभा निवडणुकीची अंमलबजावणी करतांना आदर्श आचार संहितेचे उल्लघंन होणार नाही, याची काळजी घेऊन आचार संहितेचे पालन करावे. तसेच निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांनी आपले प्रचार कार्य करताना प्रचाराच्या विविध माध्यमांचा वापर करण्यापूर्वी ते प्रमाणित करून घ्यावे. प्रचारावर होणाऱ्या सर्व खर्चाचे विवरण सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले.

“सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या’
बॅंकांनी उमेदवारांची खाती प्राध्यान्यक्रमाने उघडून घेऊन निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 10 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहाराची माहिती महाव्यवस्थापक, आयकर विभाग यांच्याकडे नोंदवावी. बॅंकांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करताना सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.