दौंड – दौंड तालुक्यात प्रत्येक जाणारा-येणारा नागरिक तपासणी करूनच गेला पाहिजे, अशा सूचना दौंड तहसील कार्यालयात आढावा बैठकीत आमदार राहुल कुल प्रशासकीय यंत्रणेस दिल्या.
दहिटणे (ता. दौंड) येथे एक करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर आज (दि. 29) तातडीने आमदार राहुल कुल यांनी दौंड तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यापुढे करावयाच्या नियोजनासंदर्भात सूचना दिल्या. सध्या तालुक्यात जो करोनाबाधित रुग्ण आढळला आहे त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची माहिती प्रशासनाने घेतली असून, त्यांच्या टेस्ट घेण्यात येणार आहेत, तसेच दहिटणे गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असणारा भाग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
दौंड आणि यवत पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी चेक पोस्ट अधिक कडक कराव्यात. त्यांना महसूल व ग्रामविकास विभागाने मदत करावी जेणेकरून कोणताही नागरिक जा-ये करत असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येईल. नगरपालिका क्षेत्रात प्रभागानुसानर नागरिकांना लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी घरपोच कशा दिल्या जातील, याबाबत काही व्यवस्था करता येते का, या संदर्भात मुख्याधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
गटविकास अधिकारी गणेश मोरे यांना प्रत्येक गावात आठवड्यातून दोन वेळा भाजीपाला बाजार भरवता येतो का, याबाबत संबंधित ग्रामपंचायत सरपंचांशी चर्चा करण्याबाबत सांगितले असून कुल स्वतः या सगळ्यांशी फोनद्वारे संपर्कात राहणार आहेत.
या आढावा बैठकीस तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी गणेश मोरे, मुख्याधिकारी मंगेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक राजगे, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संग्राम डांगे, ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया उपस्थित होते.