दौंड/यवत -दौंड तालुक्यातील दहिटणे येथील 70 वर्षीय पुरुष करोना पॉझिटिव्ह आढळून आला असल्याची माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली आहे. दौंड तालुक्यात प्रथमच करोना बाधीत आढळून आला आहे.
या बाधिताच्या मुलाला पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या सोबत त्याचे वडील रुग्णालयात होते.
20 एप्रिल रोजी घसा दुखू लागल्याने ते राहू येथे तपासणीसाठी गेले होते. तेथील डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सोमवारी ससून रुग्णालयात दाखल झाला.
त्यांचे स्वॅबचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले असून या पुरुषाच्या संपर्कात आलेल्या त्याचा मुलगा व एक महिला अशा दोघांना क्वारंटाइन करून पुणे येथील ससून रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे डॉ. अशोक रासगे यांनी सांगितले.