पिंपरी (प्रतिनिधी) –महाराष्ट्र शासनाने मंगळवारी (दि. 19) दिलेल्या आदेशावर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी (दि. 21) रात्री उशिरा सुधारित आदेश काढून शुक्रवार (दि. 22) पासून त्यांची अंमलबजावणीस सुरुवात केली आहे.सुधारित आदेश काढण्यास आयुक्तांनी तब्बल 3 दिवस घेतल्याने शहरवासीयांमधून संताप व्यक्त होत आहे.
आयुक्त हर्डीकर वेळकाढूपणा करीत असल्याने शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. करोनाने आता दाट लोकवस्तीत शिरकाव केला आहे. त्यामुळे करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परप्रांतीय कामगार गावी जात आहेत. तर पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडमधील करोना रुग्णांची आकडेवारी कमी असल्याने राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड शहराचा नॉनरेड झोनमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे बाजारपेठा, खासगी कार्यालये, उद्योग व कारखाने सुरू करण्यास मंगळवारी परवानगी दिली.
पालिका आयुक्तांच्या ढिसाळ कारभारामुळे त्यावर तातडीने निर्णय घेतला गेला नाही. कंटेन्मेंट झोन सोडून कोणत्या दुकानांना व उद्योगांना परवानगी द्यायची यावर प्रशासनाची एकवाक्यता नव्हती. सत्ताधाऱ्यांमध्ये एकसूत्रता नसल्याने आयुक्त त्यांना आणि त्यांच्या सूचनांना आपल्या पद्धतीने दूर ठेवण्यात यशस्वी झाल्याचे दिसत आहे. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे सव्वादोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून दुकाने, उद्योग, खासगी कार्यालये तसेच, बाजारपेठा बंद आहेत.