पिंपरी, (प्रतिनिधी) – भारतीय नौसेना, लष्कर आणि वायुसेना या तिन्ही सुरक्षा दलाची संरक्षण सिद्धताअसलेले हेलिकॉप्टर, रणगाडे, जड संरक्षण वाहने, तोफा अशा अनेक महत्वपूर्ण शस्त्रांस्त्रांचे प्रदर्शन मोशीत आयोजित करण्यात आले आहे. राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणार्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’तून देशाची संरक्षण दले, संरक्षण उपकरणे निर्मितीतील सार्वजनिक उपक्रम तसेच यातील खासगी उद्योग, नवीन स्टार्टअप यांची उत्पादने, नवसंकल्पना पाहता येणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, संरक्षण राज्यमंत्री अजय भट व लष्करप्रमुख मनोज पांडे यांच्या उपस्थितीत डिफेन्स एक्स्पोचे उदघाटन होणार आहे.
मोशीतील इंटरनॅशनल एक्झिबिशन अॅण्ड कन्व्हेनशन सेंटर येथे आजपासून (दि.24) सुरू होणार्या या प्रदर्शनात भारतीय नौसेना, लष्कर आणि वायुसेना या तिन्ही सुरक्षा दलांचा महत्वाचा सहभाग आहे. प्रदर्शन 26 फेब्रुवारीपर्यंत 3 दिवस सुरू राहणार असून त्यासाठी 20 दालने तयार करण्यात आली आहेत. तसेच खुल्या जागेत हेलिकॉप्टर, रणगाडे, जड संरक्षण वाहने, तोफा आदी पाहता येणार आहेत.
या प्रदर्शनातील विविध सत्रात भारताची संरक्षण सिद्धता, विविध शस्त्रास्त्रांची निर्मिती, संरक्षण क्षेत्रातील संधी याविषयी अभियांत्रिकी तसेच अन्य शाखेच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती मिळणार असून सैन्यदलात दाखल होण्याची प्रेरणा मिळेल. याशिवाय या क्षेत्रातील तंत्रज्ञान सर्वसामान्यांना अनुभवता येणार आहे,
शस्त्रास्त्रांना प्रत्यक्ष स्पर्श करून रोमांचक अनुभव घेता येणार आहे. प्रदर्शनातील चार भव्य दालनांना शिवनेरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पन्हाळा असे नाव देण्यात येणार आहे. संपूर्ण परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संरक्षण सिद्धतेची संकल्पना प्रदर्शित करण्यात येणार आहे.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रदर्शनाच्या नियोजनाची शुक्रवारी (दि.23) पाहणी केली. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, उपमुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, प्रदर्शनाचे नॉलेज पार्टनर गणेश निबे, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड, मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.
चर्चासत्रे, प्रेरक मार्गदर्शन व सादरीकरण
शनिवारी (दि.24)सकाळी साडे आठ वाजता नेव्ही बँडचे सादरीकरण होणार आहे. साडे दहा वाजता एअरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया चे अध्यक्ष डॉ.जी सतीश रेड्डी संवाद साधणार आहेत. साडेअकरा वाजता जे.डी.पाटील,अरुण रामचंदानी,अनिल कुलकर्णी (एल अँड टी) हे मार्गदर्शन करणार आहेत. 12 वाजता वायुसेनेनेचे मार्गदर्शन तर साडेबारा वाजता एयर फोर्स ड्रिल होईल.
दुपारी दोन वाजल्यानंतर ‘बुस्टिंग डिफेन्स इकोसिस्टिम’ या चर्चासत्रात ज्येष्ठ उद्योजक बाबा कल्याणी, सुंदरम राममूर्ती, सत्यनारायण नुवाल, आशिष सराफ सहभागी होतील. साडेचार नंतर एयर चीफ मार्शल विवेक राम चौधरी,कर्नल हर्ष अगरवाल,कर्नल पी.गोगोई संवाद साधतील. सायंकाळी पाच वाजता आर्मी बँडचे सादरीकरण होईल.