गणेशोत्सवासाठी नियमावली : शहरातील गणेश मंडळांसह नागरिकांना सूचना
पिंपरी – सद्यस्थितीत शहरामध्ये करोनाचा संसर्ग आहे. त्यामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेने केले आहे. सार्वजनिक मंडळांनी नियमांची अमंलबजावणी करत सण साजरा करावा. तसेच मर्यादित मंडप व सजावट करावी असे नमूद करण्यात आले आहे. घरात गणपतीची स्थापना करण्यासाठी नागरिकांनी 2 फूटापेक्षा जास्त मोठी मूर्ती घेऊ नये. तसेच मंडळांनी 4 फूटापेक्षा मोठी मूर्ती घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
करोना विषाणूच्या संक्रमणामुळे आगामी गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा याबाबत गृहविभागाने आदेश दिले आहेत. त्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील गणेश मंडळांची बैठकही घेण्यात आली. तसेच अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे. याद्वारे घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांना सूचना करण्यात आल्या आहेत. यावर्षी नागरिकांनी घरातील धातूच्या मूर्तीचे पूजन करण्यास प्राधान्य द्यावे. मूर्ती शाडूच्या मातीची असेल तर घरच्या घरी विसर्जन करावे. शक्य असल्यास मूर्तीचे विसर्जन पुढे ढकलण्यात यावे.
घऱी विसर्जनाची सोय नसल्यास जवळच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करावे. विसर्जन करत असताना कृत्रीम विसर्जनस्थळी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. गर्दीत जाणे टाळून करोना विषाणूचे संक्रमण वाढणार नाही याची काळजी घ्यावी. भाविकांनी विसर्जनस्थळी करावयाची श्रींची आरती घरीच करावी. विसर्जनस्थळी जास्त वेळ थांबू नये. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांनी विसर्जनस्थळी जाऊ नये.
गणेश मंडळांनी उत्सवासाठी वर्गणी व देणगी मागू नये. तसेच स्वेच्छेने दिली तर त्याचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची काळजी घ्यावी. करोना विषाणूला अटकाव करण्यासाठी काय केले पाहिजे यासाठी जनजागृती कऱणे. सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करणे. रक्तदानासारखे आरोग्यविषयक उपक्रम घ्यावेत.
ऑनलाइन दर्शनाचा पर्याय द्यावा
शहरातील मोठ्या मंडळांनी शक्यतो ऑनलाइन दर्शन देण्यास प्राधान्य द्यावे. त्यासाठी फेसबुक, युट्यूब, वेबसाइट याचा वापर करावा. स्क्रीनिंगची व्यवस्था करावी. मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करावे. प्रत्यक्ष दर्शन घेवू इच्छिणारे नागरिक नियमांचे पालन करतात का याबाबत दक्षता घेणे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे थर्मल स्क्रीनिंग करणे, त्यांना सॅनिटायजरची सोय करून देणे.