मंचर -लोणी (ता. आंबेगाव) कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार येथे कांद्यास दहा किलोसाठी उच्चांकी 152 रुपये बाजारभाव मिळाला. खुला मोकळा कांदा तीन ट्रॅक्टर आणि 550 पिशवी कांद्याची आवक झाली, अशी माहिती मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी दिली.
रांजणी येथील अक्षय भोर आणि लोणी येथील गंगाराम वाळुंज या शेतकऱ्यांनी आणलेल्या खुल्या मोकळ्या कांद्यास दहा किलोस 145 रुपये बाजारभाव मिळाला. लाखणगाव येथील शेतकरी बबन दौंड यांनी आणलेल्या पिशवीतील कांद्यास दहा किलोस 152 रुपये बाजारभाव मिळाला.
बबन दौंड यांचा कांदा पुणे येथील व्यापारी अनिल येवले यांनी खरेदी केला. लोणी उपबाजार येथील कांदा लिलावात महेंद्र वाळुंज, मच्छिंद्र वाळुंज, दत्ता नरवडे, प्रदीप कोचर, माउली वाळुंज यांनी कांदा खरेदी केला.
शेतकऱ्यांनी लोणी उपबाजार आवारात सोमवार, बुधवार आणि शनिवार या दिवशी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत खुला मोकळा आणि पिशवीतील कांदा प्रतवारीनुसार विक्रीसाठी घेऊन यावा, असे आवाहन निकम यांनी केले आहे.
==============