मुंबई : प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेदच्या पेहरावरून वाद निर्माण करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगावरच ताशेरे ओढले होते. यावेळी चित्रा वाघ यांनी महिला आयोगाबाबत समाजात अविश्वास निर्माण केल्याबद्दल त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे.
त्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरव्दारे त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की,”स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचे आज मनात शल्य आहे. राहिला विषय नोटीसीचा तर मला येणाऱ्या अशा 56 नोटीशीत आणखी 1 ची भर..!
जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला नोटीस द्यायला हवी तर तिला ती न देता हा नंगानाच होऊ देणार नाही…अशी भूमिका घेणारीला पाठवली…असो..छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार..!! जय हिंद …जय महाराष्ट्र …!!
दरम्यान, महाराष्ट्र महिला आयोग महाराष्ट्राची कन्या तेजस्विनी पंडितला तिच्या पोस्टरवरून नोटीस पाठवू शकते. मात्र, भरस्त्यात लाईव्ह शो करणाऱ्या, नंगानाच करणाऱ्या मॉडेलला महिला आयोग नोटीस पाठवत नाही, असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी केला. याप्रकारे उर्फी जावेदच्या मुद्द्यांवरून चित्रा वाघ यांनी थेट रुपाली चाकणकरांवर निशाणा साधला होता.
उर्फी जावेद वाद चिघळला; भाजप नेत्या चित्रा वाघ यांना महिला आयोगाची नोटीस
रुपाली चाकणकर म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने अभिनेत्री तेजस्विनी पंडितला नोटीस पाठवली नव्हती. ही नोटीस आम्ही अनुराधा या वेबमालिकेचे दिग्दर्शक संजय जाधव यांना पाठवली होती. या मालिकेच्या प्रमोशनसाठी शाळा, महाविद्यालयात पोस्टर्स लावण्यात आले होते. या पोस्टर्सवर तेजस्विनी पंडितचा धुम्रपान करतानाचा व्हिडीओ होता. यावरून विद्यार्थ्यांच्या पालकांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारींची दखल घेत आम्ही या मालिकेचे दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली, असा खुलासा त्यांनी केला.
या प्रकरणाचा संदर्भ घेऊन दोन महिलांच्या वेगवेगळ्या प्रकरणांत हेतुपुरस्सर समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच, पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांसमोर महिला आयोगाविषयी समाजात अविश्वास निर्माण केल्याबद्दल महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस बजावली आहे.