पुणे – करोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील तसेच पुण्याबाहेरील रूग्णांसाठीही वरदान ठरलेल्या महापालिकेच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरील जम्बो हॉस्पीटल मधील शेवटच्या रूग्णाला वाचविण्यासाठी महापालिकेची धडपड सुरू आहे.
बीड येथील या 60 वर्षीय रूग्नाची प्रकृती गंभीर असून या रूग्णांसाठी डॉक्टरांचे तसेच कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले असून 24 तास या रूग्णावर लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, महापालिकेकडून 30 जून पासून जम्बो हॉस्पीटल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता हा शेवटचा रूग्ण बरा होई पर्यंत हे हॉस्पीटल सुरूच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
शहरात 10 फेब्रुवारी 2021 पासून करोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरूवात झाली. त्यानंतर, अचानक शहरात रूग्णसंख्या वेगाने वाढण्यास सुरूवात झाली. परिणामी शहरातील खासगी रूग्णालयात महापालिकेने आरक्षित केलेले बेडही एका दिवसात भरण्यास सुरूवात झाल्याने महापालिकेने 23 मार्च 2021 पासून जम्बो हॉस्पीटल पुन्हा सुरू केले.
या वेळी या हॉस्पीटलमध्ये तब्बल 800 बेड पर्यंतची सुविधा वाढविण्यात आली. त्यात, 700 ऑक्सिजन बेड होते तर आयसीयू बेडही 100च्यावर तयार करण्यात आले. या हॉस्पीटलमध्ये 30 जून अखेर पर्यंत पालिकेने 3009 रूग्णांवर उपचार केले आहेत.
दरम्यान, शहरात 18 एप्रील पासून करोनाची साथ उतरणीला लागली. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवडयात या हॉस्पीटलमध्ये सुमारे दिडशेच्या आसपास रूग्ण होते. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रूग्णांची प्रकृती आणि त्यांना बरे होण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊन आधी पालिकेने 22 जून पासून जम्बो बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर, 22 जूनला या ठिकाणी 25 रूग्ण उपचार घेत असल्याने पालिकेने हे हॉस्पीटल 30 जूनला बंद करण्याचा निर्णय घेतला. पालिकेच्या नियोजनानुसार, 30 जून पूर्वी 24 रूग्ण कमी झाले. मात्र, त्यानंतर शेवटच्या रूग्णाची प्रकृती खालावलेली असल्याने त्याला इतरत्र हलविणे रूग्नाच्या जीवावर बेतू शकते त्यामुळे, हा रूग्ण बरा करण्याचा निर्धार महापालिकेच्या आरोग्य विभाग तसेच जंबोच्या व्यवस्थापनाने घेतला आहे.
त्यानुसार, या रूग्णाच्या तपासणीसाठी गुरूवारी ससून रूग्णालयाच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी या रूग्नांची तपासणी केली असून या रूग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे, पालिकेकडून जम्बो बंद करताना शेवटचा रूग्ण बरा करण्याचा निर्धार पालिका प्रशासनाने केला असून त्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे तसेच हा रूग्ण बरा होई पर्यंत जम्बो सुरू ठेवण्यात येणार आहे.
शहरात दुसऱ्या लाटेत जम्बो रूग्णालयाचा आरोग्य यंत्रणेला मोठा आधार मिळाला आहे. हे हॉस्पीटल बंद करताना शेवटचा रूग्ण बरा करूनच घरी सोडण्याचा आमचा मानस आहे. या रूग्णाची प्रकृती गंभीर असून त्याला वाचविण्यासाठी डॉक्टरांचे स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे हा रूग्ण बरा होई पर्यंत जम्बो सुरूच ठेवले जाईल. – रूबल अग्रवाल ( अतिरिक्त महापालिका आयुक्त )