नगर – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी नगरसेवकपद रद्द केलेल्या नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयास श्रीपाद छिंदम याने न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र छिंदमकडून याबाबत काही सांगितले जात नाही, पण महापालिकेला यासंदर्भात म्हणणे मांडण्याची नोटीस आली असून, 16 मार्चला पुढील सुनावणी होणार असल्याचे समजते.
छिंदमचे विद्यमान नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. मागील वर्षी महापालिकेच्या महासभेने केलेला तसा ठराव ग्राह्य धरताना ना. शिंदे यांनी तो ठराव कायम केला व विद्यमान नगरसेवकपद रद्द केले आहे. त्यामुळे तो ज्या प्रभागातून निवडून आला, त्या प्रभाग 9 मधील एक जागा रिक्त झाल्याने महापालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला पोटनिवडणुकीचा प्रस्ताव पाठवला आहे.
त्यावर आयोगाकडून निर्णय अपेक्षित असताना गुरुवारी पालिकेला छिंदम संदर्भातील याचिकेवर म्हणणे मांडण्याची नोटीस आल्याचे समजते. नगरविकासमंत्र्यांच्या निर्णयास छिंदमकडून आव्हान दिले गेले असून, त्यावर महापालिकेला म्हणणे मांडण्याची नोटीस आली आहे.