बीजिंग – भूगर्भातील पदार्थ शोधून काढण्यासाठी चीनने कॅमेरा असलेला उपग्रह अवकाशात सोडला आहे. या उपग्रहाद्वारे जमिनीचे आणि जमिनीखाली 5 मीटरपर्यंतच्या पदार्थांचे फोटो घेतले जाऊ शकणार आहेत. “चायना नॅशनल स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन’ने ही माहिती दिली आहे. “झियुआन-1 02ई’ असे या उपग्रहाचे नाव आहे. त्याला “फाईव्ह मीटर ऑपटिकल सॅटेलाईट-02′ असे देखील म्हटले जात आहे.
चीनच्या उत्तरेकडील शांक्सी प्रांतातील तईयुआन सॅटेलाईट लॉंच सेंटरमधून लॉंग मार्च-4 सी या रॉकेटच्या माध्यमातून हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला आहे. वजनाने अगदी हलका म्हणजे केवळ 2.5 किलो वजनाच्या या उपग्रहात इन्फ्रारेड, मीअर इन्फ्रारेड आणि हायपरस्पेक्ट्रल कॅमेरा बसवण्यात आला आहे.
यातून जमिनीखालील पदार्थांचेही फोटो घेणे शक्य होणार आहे. या फोटोंचा उपयोग चिनी भूगर्भ संशोधकांना खाणीसाठी योग्य ठिकाण शोधण्यासाठी होणार आहे. याशिवाय दळणवळण, शेती आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी देखील या फोटोंचा उपयोग होणार आहे.