वॉरसॉ (पोलंड) – भारताची महिला ग्रॅंडमास्टर व गतविजेत्या कोनेरू हम्पी हिने येथे सुरू असलेल्या फिडे जागतिक रॅपिड अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत सहा गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी झेप घेतली.
पहिल्या काही फेरीच्या सामन्यांत समाधानकारक कामगिरी करण्यात अपयश आलेल्या हम्पीने नंतर मात्र, सलग तीन फेरीत विजय प्राप्त करत ही कामगिरी केली आहे. हम्पीने चेक प्रजासत्ताकच्या जुलीया मोवोसेइन, जर्मनीच्या मार्टा मिश्ना व ग्रीसच्या एक्तेरीना पावलीदु यांचा पराभव केला.
पुरुषांमध्ये भारताचा ग्रॅंडमास्टर हर्षा भरतकोटीने जागतिक क्रमवारीत त्याच्यापेक्षा वरच्या स्थानावर असलेला रशियाचा ग्रॅंडमास्टर डेव्हिड पराव्यानला बरोबरीत रोखले. खुल्या गटातील सहाव्या फेरीत 21 वर्षीय भरतकोटी आणि पराव्यान यांच्यातील लढत 42 चालींनंतर बरोबरीत सुटली.
त्याआधी भरतकोटीने रौफ मामेदोव्ह, व्लादिस्लाव्ह कोव्हालेव्ह आणि व्होल्दोमेर यांच्यावर विजयांची नोंद केली होती. तसेच त्याने सर्गे मोवेसीनला बरोबरीत रोखले होते. भारताचा ग्रॅंडमास्टर विदित गुजराथीला मात्र पराभव पत्करावा लागला. त्याला अमेरिकेच्या फॅबिआनो कारुआनाने पराभूत केले, तर निहाल सरिनवर अलेक्सी ड्रीव्हने मात केली.