जळगाव – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बॅंकेच्या माजी अध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या वाहनावर सोमवारी रात्री हल्ला करण्यात आला होता. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आज केला आहे. हा हल्ला मला घाबरवण्यासाठी होता, मात्र मी या हल्ल्याने घाबरणारी नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. मी महिलांच्या पाठीशी आहे आणि अशीच कायम उभी राहणार असे त्या म्हणाल्या.
आमचे जिल्हाध्यक्ष आणि मी मतदान केंद्रांवर फिरत होतो तेव्हा शिवसेनेच्या लोकांनी आमच्याशी हुज्जत घातली, धक्काबुक्की केली. आम्ही पोलिसांना याप्रकरणी निवेदनही दिले होते. मुक्ताईनगरमधील अवैध धंद्याबाबतही आम्ही लेखी तक्रार दिली होती, त्यातूनच हल्ल्याचा हा प्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला.
काल रात्री एका शॉर्टकटच्या रस्त्यातून निघत असताना आमच्यासोर तीन दुचाकी आल्या. आमची गाडी अडवली. एकी दुचाकीवर तीन, आणि इतर दोन्हींवर दोन-दोन असे सात लोक होते. चालक गाडीवर बसून होते. मागे बसलेले चौघं गाडीच्या दिशेने आले. यावेळी एकाच्या हातात पिस्तूल, एकाच्या हातात तलवार आणि एकाच्या हातात रॉड होता. ते माझ्या बाजूला आले, एकाने माझ्यावर पिस्तूल रोखून धरलं होतं. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण तो उघडत नसल्याने त्यांनी रॉड काचेवर मारला.
मी खाली वाकले म्हणून वाचू शकले. मला जीवे ठार मारण्याच्या हेतूने आले होते हे स्पष्ट आहे. कारण त्यांनी माझ्याच बाजूने हल्ल्याचा प्रयत्न केला, असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. मी ड्रायव्हरला गाडी पळवायला सांगितली. पोलीस येईपर्यंत ते लोक फरार झाले होते. माझा न्यायव्यवसथेवर विश्वास आहे, असेही त्यांनी नमूद केले.