न्यूयॉर्क : अमेरिकेत करोनामुळे मृत पावलेल्यांचा आकडाही भयंकर वाढत असून, अमेरिकेचे अध्यक्ष करोनाच्या प्रसारावरून सातत्याने चीनवर टीका करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर आता आणखी एक गंभीर आरोप केला आहे. आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत माझा पराभव व्हावा, मी पुन्हा निवडून येऊ नये म्हणून चीन काहीही करू शकतो,” असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
करोनासंदर्भा डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘रॉयटर’ला मुलाखत दिली. ओव्हलमधील कार्यालयात झालेल्या मुलाखतीत बोलताना ट्रम्प म्हणाले,”करोना विषाणुमुळे चीनला होणाऱ्या परिणामांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पर्यायांचा शोध घेत आहे. मी खूप काही करू शकतो. अमेरिकेमध्ये करोनाचा प्रसार रोखण्यासाठी तातडीनं तयारी करायला हवी होती, असा आरोप होतो. पण, चीननं करोना विषाणूबद्दल जगाला लवकरात लवकर जगाला माहिती देण्याची तत्परता दाखवायला हवी होती. मी खूप साऱ्या गोष्टी केल्या आहेत नेमकं काय घडलं याचा विचार आम्ही सध्या करत आहोत. राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत माझा पराभव व्हावा म्हणून चीन काहीही करू शकतो. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि माझे प्रतिस्पर्धी जोए बिडेन विजयी व्हावे अशी बीजिंगची इच्छा आहे. कारण व्यापार आणि आयात-निर्यातीसंदर्भात मी टाकलेला दबाव कमी करण्यासाठी चीन हे करत आहे,” असा दावा ट्रम्प यांनी केला.
करोनामुळे अमेरिकेतील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. अमेरिकेतील करोना बळींची संख्या व्हिएतनाम युद्धापेक्षा अधिक झाली आहे. अमेरिकेत करोनाने घेतलेल्या बळींची संख्या ५८,३५५ झाली असून व्हिएतनाम युद्धात अमेरिकेचे ५८,२२० सैनिक बळी पडले होते. अमेरिकेतील रुग्णांची संख्या १० लाखांवर गेली आहे. व्हिएतनाम युद्ध १९५५ मध्ये सुरू झाले व १९७५ मध्ये संपले होते. जगात एकूण दोन लाख तेरा हजार बळी गेले असून त्यातले एक चतुर्थाश अमेरिकेत गेले आहेत. अमेरिकेतील रुग्णांचे प्रमाण जगाच्या एक तृतीयांश असून जगात ३१ लाख लोकांना संसर्ग झाला आहे.