जुन्नर -तालुक्यातील सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री फंडासाठी सतरा लाख बेचाळीस हजार रुपयांचा निधी दिला आहे. 49 लाख 22 हजार रुपयांच्या साहित्याचे वाटप केल्याची माहिती जुन्नर तालुका सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम यांनी दिली. जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील सहकारी संस्थांनी करोना विरुद्धच्या लढ्यात सर्वाधिक मदत केल्याचे मेश्राम यांनी यावेळी सांगितले.
या मदतकार्यात जुन्नर तालुक्यातील 37 संस्थांनी सहभाग घेतला असून या पुढील काळातही सहकारी संस्थांनी मदतीचा ओघ सुरू ठेवावा असे आवाहन मेश्राम यांनी केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील गरजू 2 हजार 200 कुटुंबांना 14 लाख 54 हजार रुपयांचा शिधा देण्यात आल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. संजय काळे यांनी सांगितले.
यासाठी तहसील कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील गरजू 3800 कुटुंबांची नावे काढण्यात आली होती. तर विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने तीस लाख रुपयांचे सॅनिटायझर, धान्याचे वाटप करण्यात आले.
नारायणगाव येथील विरोबा, अजिंक्यतारा, चंद्रशेखर, श्रीराम, विक्रांत, धर्मवीर संभाजी, वसंतदादा पाटील, शिवस्तुर्ती तसेच बेल्हे येथील श्रीपाद, जयजवान, साईकृपा, साधना, यशवंतराव चव्हाण, बांगरवाडी आदी पतसंस्थांनी या मदतकार्यात सहभाग नोंदविला आहे. तसेच ग्रामीण भागातील पिंपरी पेंढार, पिंपळवंडी, ओतूर, आळे, खोडद, वडगाव कांदळी, वडगाव आनंद, राजुरी, काळवाडी येथील पतसंस्थांनी या संकटकाळात आपले दातृत्व दाखवून दिले आहे.