Pune Porsche car accident Case: पुणे पोर्शे कार अपघाताबाबत पुणे पोलीस सक्रिय झाले आहेत. या प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. विशालविरुद्ध कलम 201 आणि कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कलम 201 अन्वये पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला जाईल. कारण पोलिस तपासात समोर आले आहे की, विशालने त्याच्या ड्रायव्हरला आपणच गाडी चालवत असल्याचे खोटे बोलण्यास सांगितले होते.
यासोबतच आरटीओच्या तक्रारीनंतर आरोपी वडील विशालविरुद्ध कलम 420 अन्वये दुसरा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. वास्तविक, पोलिसांना यापूर्वी पोर्श कारची नोंदणी झाल्याचे सांगण्यात आले होते, परंतु कारची नोंदणी झाली नव्हती. ही खोटी माहिती होती.
दुसरीकडे, गुरुवारी (23 मे) सोशल मीडियावर दोन व्हिडिओ व्हायरल झाले. या व्हिडिओंबाबत, त्यात दिसत असलेला मुलगा पुणे अपघात प्रकरणातील आरोपी असल्याचा दावा करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये हा मुलगा गैरवर्तन करताना आणि स्वत:ला श्रीमंत म्हणवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा हा अल्पवयीन आरोपी नसून मध्य प्रदेशचा राहणारा आर्यन असल्याचे आता समोर येत आहे. आता पुणे पोलीस आर्यनचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस त्याच्यावर योग्य ती कारवाई करतील.
दरम्यान, अपघाताच्या वेळी त्याच्या कुटुंबाचा चालक कार चालवत होता, असा दावा या अल्पवयीन मुलाने केला आहे. अपघाताच्या वेळी त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या दोन मित्रांनी त्याच्या दाव्याचे समर्थन केले आहे. कार ज्या मार्गावरून गेली त्या संपूर्ण मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिस गोळा करत आहेत. यामध्ये घरापासून रेस्टॉरंट, नंतर ब्लॅक क्लब आणि तेथून अपघातस्थळापर्यंतचा समावेश आहे. अपघाताच्या वेळी कार कोण चालवत होता, याचा पोलिस शोध घेत आहेत. फॉरेन्सिक टीमने अपघातात सामील असलेल्या पोर्श कारचीही तपासणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
ही घटना 19 मे रोजी पहाटे घडली. पुण्यातील कल्याणीनगर भागात रिअल इस्टेट डेव्हलपर विशाल अग्रवाल यांच्या 17 वर्षीय मुलाने दोन दुचाकीस्वार अभियंत्यांना त्याच्या स्पोर्ट्स कार पोर्शने चिरडले. दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेच्या 14 तासांनंतर अल्पवयीन आरोपीला कोर्टातून काही अटींसह जामीन मिळाला. न्यायालयाने त्यांना 15 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याचे निर्देश दिले होते आणि रस्ते अपघातांचे परिणाम आणि उपाय यावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितले होते. त्यानंतर सोशल मीडियावर या निर्णयाबाबत मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले. आरोपी अल्पवयीन मुलाला पुन्हा 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. तर आज कोर्टात झालेल्या सुनावणीनुसार आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.