Lok Sabha Elections 2024 – लोकसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्यासाठी उद्या (शनिवार) मतदान होणार आहे. त्या टप्प्यात ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ५८ जागांसाठी मतदार त्यांचा कौल देतील. सहाव्या टप्प्यात देशाची राजधानी दिल्लीतील सर्व ७ आणि हरियाणातील सर्व १० जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
त्याशिवाय, उत्तरप्रदेशातील १४, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ८, ओडिशातील ६, झारखंडमधील ४ मतदारसंघांमध्ये मतदान होईल. जम्मू-काश्मीरमधील १ जागा त्या प्रक्रियेला सामोरी जाईल. सहाव्या टप्प्यात एकूण ८८९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
त्यांचे भवितव्य ११ कोटी १३ लाखहून अधिक मतदार ठरवतील. प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या मनेका गांधी, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, कॉंग्रेसचे तरूण नेते कन्हैया कुमार आदींचा समावेश आहे.
उद्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीचे मतदान शिल्लक राहील. ते मतदान १ जूनला होईल. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठीची मॅरेथॉन मतदान प्रक्रिया पूर्ण होईल.