तळेगावातील ऊस परिषदेत शेतीप्रश्नांवर मागण्या
तळेगाव ढमढेरे- सध्या राज्यातील सरकारमध्ये सत्तांतर झाले झालेले आहे. सत्तेत आलेल्या शिंदे- फडणवीस सरकारचे काहीही खरे नसून जसे चोरांच्या चोऱ्या करण्यासाठी जुळवाजुळव सुरु असते. तसे राज्यकर्त्यांची सत्ता मिळवण्यासाठी जुळवाजुळव सुरु आहे. हे सत्तारूढ सरकार चालवण्याच्या पात्रतेचे नसून आम्ही राजकीय पक्षांचा नाद सोडून दिला आहे. हे सरकार येत्या सहा महिन्यांत कोसळेल, असे भाकीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केले.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ऊस परिषदेदरम्यान ते बोलत होते. यावेळी पाटील यांनी कृषी धोरणावर चौफेर टीका करीत वास्तव मांडले. त्यांनी काय झाडी, काय डोंगरवरून देखील सरकारवर निशाना साधला.
यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, संघटनेचे उपाध्यक्ष ऍड. अजित काळे, शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष पांडुरंग रायते, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत वीर, युवा आघाडीचे अध्यक्ष रामेश्वर गाडे, शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे, बाबा हरगुडे, महिला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वर्षा काळे, वस्ताद दौंडकर, ऍड सुधीर ढमढेरे, श्रीकांत ढमढेरे, राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना कमी पैसे देता आणि दुसरीकडे साखर कारखान्यांवर कोट्यवधी रुपये कर्ज करुन ठेवता. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत, अशा शब्दांत साखर कारखानदारांवर घणाघात केला. राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार हे पाच ते सहा महिन्यांत पडेल. कोण कोणाच्या गळ्यात पडेल. काही सांगता येत नाही असा टोला त्यांनी लगावला.
यावेळी परिषदेत आम्ही राजकीय पक्षाचा नाद सोडला, असा ठराव केला. सर्व शेतकऱ्यांनी एकमुखाने ठरावास पाठिंबा दिला. यापुढे शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या हिताचे बळीचे राज्य आणण्यासाठी सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्धार करण्यात आला. परिषदेत दोन सहकारी साखर कारखाने व इथेनॉल कारखान्यांमधील अंतरांची अट रद्द झाली पाहिजे.
कांदा, बटाट्यावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी हटली पाहिजे, सातबाऱ्यावरील पुनर्वसनचे शिक्के हटले पाहिजेत, शेतकऱ्यांचे कर्ज व वीजबिल माफ झाले पाहिजे आदी मागण्या करण्यात आल्या आहे. शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे यांनी आभार मानले.