“आमचं ठरलंय” टीमची निघाली हवा

मुख्यमंत्र्यांनी केले शिवेंद्रसिंहराजे, जयकुमार गोरे यांचे कौतुक

सातारा  – “आमचं ठरलंय” या घोषवाक्‍याद्वारे सुरुवातीला माण-खटावमध्ये जयकुमार गोरे यांना आणि त्यानंतर सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध करण्यात आला. मात्र, जिल्ह्यात नुकत्याच येऊन गेलेल्या भाजपच्या महाजनादेश यात्रेत “आमचं ठरलंय” टीमच्या उपस्थितीत मुख्यमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्षांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले व जयकुमार गोरे यांचे कौतुक केले. त्यामुळे “आमचं ठरलंय” टीमची हवाच निघाली आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्यापूर्वी इच्छुक उमेदवार दीपक पवार यांची पश्‍चिम महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळावर नियुक्‍ती करण्यात आली. त्यानंतरही ते विधानसभेच्या उमेदवारीवर ठाम राहिले. शिवेंद्रसिंहराजे यांना प्रवेश देण्यापूर्वी पक्षश्रेष्ठी आपल्याला विचारात घेतील, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली होती. मात्र, पवारांना विचारात न घेता शिवेंद्रसिंहराजेंचा पक्षप्रवेश झाला. माढा लोकसभा मतदारसंघात किंगमेकरची भूमिका बजावणाऱ्या जयकुमार गोरे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चादेखील तीन महिन्यांपासून सुरू होती. अनिल देसाई, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर व मतदारसंघातील सर्व भाजप नेत्यांनी एकत्र येत गोरे यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला. मात्र, सर्वांचा विरोध डावलून गोरेंचा चक्‍क भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. त्यानंतरदेखील गोरे यांच्या उमेदवारीला विरोध कायम राहिला.

महाजनादेश यात्रेच्या एक दिवस अगोदर माण-खटावमध्ये भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन जयकुमार गोरे यांच्या उमेदवारीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ना. गिरीश महाजन जयकुमार गोरे, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि हे जिहे-कठापूर योजनेचे भूमिपूजन करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेच्या सभेत देसाई व येळगावकर यांच्या उपस्थितीत घोषित केले. त्यांनी देसाई व येळगावकर यांचा साधा उल्लेखदेखील केला नाही.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे भाजपमध्ये “आमचं ठरलंय” वगैरे प्रकार चालत नाहीत, असा सूचक इशारा दिला. साताऱ्यातही शिवेंद्रसिंहराजेंच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी दीपक पवार, अमित कदम आणि शिवसेनेचे सदाशिव सपकाळ, एस. एस. पार्टे, योगेश गोळे यांनी पत्रकार परिषद घेऊन “आयात’ उमेदवार लादून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला. मात्र, त्याचीही पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली नाही. उलट महाजनादेश यात्रेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दीपक पवार यांच्या उपस्थितीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना उच्चांकी मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. त्यावेळी पवार यांच्या चेहऱ्यावरील निराशा लपून राहिली नाही. एकूणच भाजप स्वपक्षातील नेत्यांचा विरोध मोडून काढत केवळ निवडून येणाऱ्यांनाच उमेदवारी देणार, हे निश्‍चित झाले आहे. आता निवडणुकीत “आमचं ठरलंय” टीम कोणती भूमिका घेते, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)