पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आपल्या भाषेवर व संस्कृतीवर प्रेम केले पाहिजे आणि खिशातल्या मोबाइलचा वापर कमी करून पुन्हा वाचनाकडे वळणे गरजेचे आहे. भाषेची आजची अवस्था पाहता नव्या पिढीतील मुलांना मराठी भाषा नव्याने शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी केले. भारती विद्यापीठाच्या ६० व्या वर्धापनदिन समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप आदी उपस्थित होते. भारती विद्यापीठाच्या विचारभारती या मुखपत्राच्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन झाले. पाटील म्हणाले, आज समाजात संस्कृती बाजूला राहून विकृती निर्माण झाली आहे. पूर्वीचे राजकारणी नेते हे त्यागातून उभे राहिले होते. आजच्या नेत्यांमध्ये ती तडफ आणि निष्ठा दिसून येत नाही. आपण आपले आदर्श नीट समजून घेणे आवश्यक आहे. डॉ. शिवाजीराव कदम यांनी बदलत्या काळाची पावले ओळखून आपल्याला गुणवत्ता केंद्रस्थानी ठेवून पावले टाकावी लागणार असल्याचे म्हटले. डॉ विश्वजीत कदम म्हणाले, आधुनिक शिक्षण क्षेत्रातील बदलत्या घडामोडींत एक पाऊल पुढे राखण्याचे काम भारती विद्यापीठाने सातत्याने केले आहे.