T20 World Cup 2024 : विश्वचषकानंतर बदलणार टीम इंडियाचे प्रशिक्षक! रिपोर्ट्समध्ये मोठा खुलासा, जय शहा यांनी केले ‘हे’ विधान..

नवी दिल्ली – टी20 विश्वचषक 2024 जूनमध्ये सुरू होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकात मोठा बदल होऊ शकतो. वास्तविक, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा करार 2023 च्या वनडे वर्ल्ड कपनंतर वाढवण्यात आला होता. नोव्हेंबर 2021 पासून ते टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर आहेत. मात्र, आता बोर्ड लवकरच नव्या प्रशिक्षकाची जाहिरात देणार असल्याची बातमी समोर आली आहे. द्रविडचा करार जूनमध्ये T20 विश्वचषक 2024 सह संपुष्टात येणार आहे.
बीसीसीआय मागवणार प्रशिक्षकासाठी अर्ज,
राहुल द्रविडचा कार्यकाळ जूनमध्ये संपणार,
इच्छा असल्यास ते अर्ज करू शकतात- शहा
टीम इंडियाला लवकरच नवीन मुख्य प्रशिक्षक मिळण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) लवकरच नवीन प्रशिक्षकासाठी अर्ज मागवणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ही माहिती दिली आहे.
सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ जूनमध्ये पूर्ण होत आहे. त्यावरही शहा यांनी यावेळी प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, राहुल यांचा कार्यकाळ जूनपर्यंतच आहे. त्यामुळे जर त्यांना अर्ज करायचा असेल तर ते तसे करण्यास मोकळे आहेत. मात्र, कोचिंग स्टाफमधील इतर सदस्य जसे की फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांची निवड नवीन प्रशिक्षकांशी सल्लामसलत केल्यानंतर केली जाईल. तसेच, नवा प्रशिक्षक भारतीय असेल की परदेशी असेल हे आम्ही ठरवू शकत नाही.
द्रविड यांची नोव्हेंबर 2021 मध्ये टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती. बीसीसीआयने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचा कार्यकाळ वाढवला होता. द्रविडसह संपूर्ण भारतीय कोचिंग स्टाफचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. यामध्ये फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांचा समावेश होता.
द्रविड यांची कामगिरी…
द्रविड यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात टीम इंडियाने एकदिवसीय विश्वकरंडकाची अंतिम फेरी गाठली होती. मात्र फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेला पराभव वगळता भारताने विश्वकरंडकातील सर्व सामने जिंकले होते. त्याचबरोबर विश्वकरंडकापूर्वी भारताने द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली आशिया करंडकही जिंकला आहे.
इम्पॅक्ट खेळाडूबाबद पुनर्विचार
याप्रसंगी बोलताना शहा म्हणाले की, टी-20 विश्वकरंडकानंतर सर्व संघ एकत्र येऊन इम्पॅक्ट खेळाडूच्या निर्णयावर चर्चा करतील. जर खेळाडू आणि फ्रँचायझींना हा निर्णय आयोग्य वाटत असेल तर त्याचा पुनर्विचार केला जाईल. हा कायमचा नियम नाही, त्यामुळे सल्लामसलत करून निर्णय होईल.
IPL 2024 : रनमशीन कोहलीच्या नावे आणखी दोन विक्रमांची नोंद; ‘या’ बाबतीत दिग्गज खेळाडूंना टाकलं मागे…
महिला क्रिकेटला प्रोत्साहन
महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी सामन्यांची संख्या वाढवण्यावरही बोर्डाचा भर असल्याचे शाह यांनी सांगितले. ते म्हणाले, पुरुष क्रिकेटप्रमाणेच महिला क्रिकेटचीही काळजी घेतली जात आहे. विश्वचषक बांगलादेशमध्ये होणार आहे आणि नुकतीच महिला संघाने बांगलादेशातील टी-20 मालिकेत अप्रतिम कामगिरी केली आहे. महिलांनी 5 सामन्याच्या मालिकेत 5-0 ने निर्भेळ यश मिळवले आहे.





