मुुख्यमंत्री कुणाचा, हे अजून ठरलेलं नाही – चंद्रकांत पाटील

दर्पोक्‍ती करणाऱ्या भाजप नेते आणि आमदारांना चपराक

मुंबई -आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचाच मुख्यमंत्री होणार, अशी दर्पोक्ती करणाऱ्या भाजप नेतेमंडळी तसेच आमदारांना भाजपचे ज्येष्ठ नेते व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चपराक दिली आहे.

“शिवसेना आणि भाजप युती करून निवडणूक लढणार असले, तरी मुख्यमंत्री कुणाचा हे अद्याप ठरलेलं नाही. ते जर ठरलं असेल तर त्याविषयी आपल्याला माहीत नाही. तो माझा प्रश्‍न नाही. ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ठरवतील,’ असे असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिले.

मुख्यमंत्री कोणाचा? या पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तर देताना पाटील म्हणाले, “मुख्यमंत्रिपदाविषयी काही ठरलं असेल तर ते आपल्याला माहीत नाही. आम्ही असे कार्यकर्ते आहोत, की आपल्याला दिलंय तेवढं काम करायचं. मुख्यमंत्री कुणाचा हे अद्याप ठरायचं आहे. मुख्यमंत्रीपद शिवसेनेला मिळाले तर कोणाला मुख्यमंत्री करायचा हा त्यांचा प्रश्‍न आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 1 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या जनादेश यात्रेची माहिती देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी आज भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते. अमरावती जिल्ह्यातील मोजरी येथून 1 ऑगस्ट रोजी या महाजनादेश यात्रेची सुरुवात होणार असून 31 ऑगस्टला नाशिक येथे समारोप होणार आहे. उद्‌घाटनाला राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेत, यासाठी प्रयत्नशील असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. महायुतीच्या सरकारला पाच वर्षं पूर्ण झाली. या काळात सर्वसामान्य जनतेला सुखी, आनंदी आणि सुरक्षित करण्यासाठी अनेक निर्णय घेतले. त्यामुळे नवीन विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेला भेटायला जावे. जनतेचा विश्‍वास आम्ही सार्थ ठरवला असून येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा आम्हाला संधी द्या, ही विनंती करण्यासाठी ही जनादेश यात्रा असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदाविषयी पाटील यांनी नवीन “गुगली’ टाकली असल्याने शिवसेनेच्या काही नेत्यांना हत्तीचे बळ आल्याचे बोलले जात आहे. यावर काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)