झेंडा बदलणाऱ्यांसाठी मतदारांचाही आता “आमचं ठरलयं’चा नारा

दिलीपराज चव्हाण

उंब्रज  – “तू पण…, हा पण…, सत्तेसाठी काय पण…’ अशी अवस्था सध्या राजकारणात होऊ घातलेली असून याची प्रचिती सर्वत्र दिसून येत आहे. सत्तेसाठी निष्ठा हा शब्द आता कुठेच दिसत नसून आपल्या पदरात सत्ता पाडून घेण्यासाठी झेंडा कोणाचाही असला तरी वर्चस्व आपलेच हवे, याप्रमाणे सर्वत्र चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे नेते मंडळींच्या अशा वागण्याने राजकारण व राजकारण्यांच्याकडे बघण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन बदलू लागला आहे.

एक काळ असा होता की पक्ष, पार्टी निष्ठेचे फळ म्हणून सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यालाही पक्षात मोठ्या पदांवर काम करण्याची संधी मिळायची. यावेळी पक्षाने जबाबदारी (उमेदवारी) दिली कि त्या कार्यकर्त्याला स्वर्ग दोन बोटे उरायचे. ग्रामपंचायतींपासून लोकसभेपर्यंत सर्वच निवडणुकीत हा फार्मुला लागू पडत होता. पण गेल्या काही वर्षात निष्ठा हा शब्द शिवी सारखा वाटू लागला आहे. कारण प्रत्येक जण स्वतःच्या महत्वकांक्षेसाठी महिन्यात तीन-तीन पक्ष बदलत नेते, कार्यकर्ते होऊ लागले आहेत.

सकाळी एका पक्षाकडे उमेदवारी अर्ज मागणी, दुपारी दुसऱ्या पक्षाकडे उमेदवारी मागणारे तर रात्री तिसऱ्याच पक्षातून उमेदवारी घोषित होणारे नेते भेटले तर नवल वाटत नाही. या सर्वांचे एकच ठरलेले वाक्‍य कार्यकर्त्यांनी ठरवलं म्हणून मी हा निर्णय घेत आहे. पण हा त्याचा स्वतःच्या स्वार्थासाठी निर्णय घेत असताना सामान्य कार्यकर्त्याची ससेहोलपट होते, याच या मंडळींना सोयरसुतक नसते हे दुर्दैव म्हणावे लागेल.

ज्या जनतेला मतदार राजा म्हणून संबोधले जाते. त्यांच्याच मतांच्या जोरावर हे निवडणूक लढवतात व निवडूनही येतात. त्यांना दाखवलेली खोटी स्वप्ने ही स्वतःच्या स्वार्थासाठी मोडून पक्षाची ध्येयधोरणे सोडून मलाच का नाही, म्हणून पक्ष बदलण्याची एक फॅशनच आजकाल रूढ झाली आहे. वाडवडील ज्या पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करून नेता झालेला असतो. त्याचाच मुलगा बापाच्या विरोधात बंड करुन दंड थोपटून इतर पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळविण्यात धन्यता मानत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय पक्ष बदलणारी ही नेते मंडळी जर पक्षाशी एकनिष्ठ नसतील, तर ती सर्वसामान्य जनतेला कितपत न्याय देत असतील, हा संशोधनाचा विषय बनला आहे.

नेते मंडळी स्वतःच्या फायद्यासाठी आमचं ठरलयं म्हणतात. मग कार्यकर्त्यांनी पण त्याचीच री ओढत आमच ठरलय म्हणायचे व ठरवून एकाद्याचा कार्यक्रम करायचा हे चित्र निर्माण झाले आहे. भोळी जनता पाच वर्षातून येणाऱ्या एका निवडणुकीत मग डोळे झाकून ज्या बाजूला जास्त भपका आहे, अशा बाजूला मतदान करतात. ही सुद्धा एक शोकांतिका आहे. जनतेने ठरवले पाहिजे हा नेता आज इथे आहे, हा उद्या कुठे असेल याचा नेम नाही. अशा उमेदवारांना निवडून द्यावं कि नाही हे मतदार म्हणून प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे.

पक्ष कि व्यक्ती बघून मतदान करायचे, का जो नेता आपल्या विचारांवर ठाम आहे. अशा व्यक्तीला मतदान करायचे हे ठरवण्याची वेळ आता आली आहे. स्वत:च्या दांड्या साठी झेंडा बदलण्याऱ्यांना आता मतदारांनीच म्हणलं पाहिजे “आता आमचही ठरलयं…!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)