अनुकंपा तत्त्वावरील भरती रखडली

अनुकंपाधारकांकडून संजीवराजे नाईक निंबाळकरांना निवेदन 

नागठाणे  – सातारा जिल्हा परिषदेतील अनुकंपा तत्त्वावरील नोकर भरतीची प्रक्रिया वर्षानुवर्षे रखडत असल्याने अनुकंपाधारक उमेदवारांची संख्याही वर्षानुवर्षे वाढतच आहे. येत्या काळात ही भरती प्रक्रिया नेमकी कधी होईल, याबाबतही अद्याप संभ्रम असल्यामुळे अनुकंपाधारकांच्यात चिंतेचे वातावरण आहे.

राज्य सरकारी कर्मचारी सेवेत असताना त्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियास सहाय्य व्हावे, त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र त्यास गेल्या काही वर्षांत कोलदांडा मिळत आहे. वेळीच अंमलबजावणी होत नसल्यामुळे सातारा जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावरील नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची संख्या वर्षानुवर्षे वाढतच चालली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भरती प्रक्रिया होईल, या आशेवर अनुकंपाधारक होते. मात्र अद्यापी त्याबाबत कोणत्याही हालचाली होत नसल्यामुळे सर्वांची अस्वस्थता वाढत चालली आहे.

या पार्श्‍वभूमीवर अनुकंपा प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांमार्फत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. निंबाळकर यांनी येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अनुकंपाधारकांविषयी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या अर्चना देशमुख, बापूराव जाधव, भीमराव पाटील, बाबासाहेब पवार, अभय तावरे आदी उपस्थित होते. अनुकंपाधारकांच्या वतीने संकेत शेडगे, अनिरुध्द कोकाटे, संग्राम पाटणकर, सूरज देशमुख, पंकज बाचल, गणेश सपकाळ, योगेश भोसले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)