पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी पदी एस. चोक्कलिंगम यांची नियुक्ती केली आहे. कडक, शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून चोक्कलिंगम यांची ओळख आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चोक्कलिंगम यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुणे येथील यशदा या प्रशासकीय संस्थेचे महासंचालक पदावर चोक्कलिंगम हे कार्यरत होते. चोक्कलिंगम यांनी यापूर्वी पुणे विभागीय आयुक्त, भूमि अभिलेख विभागाचे जमाबंदी आयुक्त, शिक्षण आयुक्त, राज्याचे नोंदणी महानिरीक्षक या पदावर काम केले आहे. चोक्कलिंगम यांच्या निवडीचे आदेश भारत निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव राहुल शर्मा यांनी जारी केले आहेत.
दरम्यान, मावळते राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मागील वर्षभरात मतदार नाव नोंदणीवर भर दिला. तसेच महाविद्यालयांमध्ये मतदार जागृतीचे कार्यक्रम हाती घेतले. याचसह मतदानाची टक्केवारी वाढीवर भर दिला, मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी मोठ्या गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला.