पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकास अखेर मुहूर्त मिळाला असून, आयुक्त विक्रम कुमार दि. ७ मार्च रोजी अंदाजपत्रक सादर करणार आहेत.
प्रत्यक्षात मुख्यसभेच्या ठरावानुसार आयुक्तांनी जानेवारीच्या आधीच अंदाजपत्रक सादर करणे बंधनकारक असले, तरी आयुक्तांकडून त्यास अनिश्चित काळासाठी मुदतवाढ घेतली होती. मात्र, एप्रिल- मेमध्ये लोकसभा निवडणुका होणार असल्याने डिसेंबर २०२३ मध्येच अंदाजपत्रक करण्याचे सूतोवाचही आयुक्तांनीच यापूर्वी केले होते.
मात्र, प्रत्यक्षात मार्च उजाडला आहे. त्यामुळे दि. ७ मार्चनंतर केव्हाही आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यंदाचे अंदाजपत्रक दहा हजार कोटींचा टप्पा पार करणार असल्याची चर्चा आहे. तर, लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हे अंदाजपत्रक येत असल्याने तसेच प्रशासक म्हणून आयुक्त ते सादर करणार असल्याने या अंदाजपत्रकात पुणेकरांना काय मिळणार, याकडे पुणेकरांचे लक्ष असणार आहे.
जुने, की नवे आयुक्त?
आयुक्त विक्रम कुमार यांनी अंदाजपत्रकाचा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवला असला, तरी त्यांची बदली होण्याची शक्यता आहे. आयुक्तांना साडेतीन वर्षांपेक्षा अधिक काळ झाल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार बदली होणे अपेक्षित होते. मात्र, आयुक्तांनी शासनाकडून मेपर्यंत मुदतवाढ आणल्याची चर्चा होती. मात्र, पुन्हा मागील दोन दिवसांपासून आयुक्तांची बदली झाल्याचे सांगण्यात येत असल्याने दि. ७ मार्च रोजी नवे, की जुने? आयुक्त अंदाजपत्रक सादर करणार अशी प्रशासकीय चर्चा आहे.
या घटकांना निधी मिळण्याची शक्यता
– समाविष्ट गावांना निधीची अपेक्षा
– नगरसेवक नसल्याने स्थानिक कामांना निधी नाही
– मोठ्या प्रकल्पांवरच ततुदीची शक्यता
– दोन हजार कोटींच्या प्रक्ल्पांच्या खर्चाचा भार
– सातव्या वेतन आयोगासाठी निधी भरीव तरतूद