नवी दिल्ली – या वर्षाच्या अखेरिस होणाऱ्या छत्तीसगढ विधानसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आपली पहिली उमेदवार यादी जारी केली. त्यातील एका महत्वाच्या जागेवर बघेल विरूध्द बघेल अशी लढत होण्याची शक्यता आहे.
पक्षाने दुर्ग मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले खासदार विजयकुमार बघेल यांना आता आमदाराकीसाठी तिकिट दिले असून ते पाटन येथून आपले काका आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या विरोधात रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. तसेच मुख्यमंत्री बघेल यांनी ते आपल्या बालेकिल्ल्यातूनच रिंगणात उरतील की अन्य मतदारसंघाची निवड करतील हे अद्याप जाहीर केलेले नाही. तथापि, भाजपने मात्र त्यांच्या पुतण्याला लोकसभेतून पुन्हा विधानसभेत पाठवण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्र्यांची आपल्याच मतदार संघात कोंडी करण्याची भाजपची योजना असल्याचे सध्या तरी म्हटले जाऊ शकते.
विशेष म्हणजे 2008 मध्ये झालेल्या निवडणुकीत याच मतदारसंघातून विजय कुमार बघेल यांनी भूपेश बघेल यांचा पराभव केला होता. 2013 मध्ये भूपेश यांनी या पराभवाची परतफेड केली होती. 2018 मध्ये विजयकुमार विधानसभेच्या रिंगणात उतरले नाहीत. मात्र 2019 मध्ये दुर्ग येथून कॉंग्रेसच्या महिला उमेदवाराचा तब्बल चार लाख मतांनी पराभव करत त्यांनी संसद गाठली होती.