नवी दिल्ली – भाजप आता छत्तीसगडमधील कॉंंग्रेस आमदारांना मंत्रिपदाचे आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्याचे आमिष दाखवून त्यांची शिकार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केला आहे.
येथील स्वामी विवेकानंद विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी असा दावा केला की, एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागणार असल्याने भाजप अशा डावपेचांचा अवलंब करत आहे.
एका प्रश्नाला उत्तर देताना बघेल म्हणाले, काँग्रेसच्या एका आमदाराने मला नुकतेच विधानसभेत सांगितले की भाजपने त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट आणि मंत्रिपद देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याशी संपर्क साधला.
अशा चर्चा विविध आमदारांच्या बाबतीत सुरू आहेत. ते म्हणाले की, बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील अलीकडील राजकीय घडामोडी स्पष्टपणे दर्शवतात की २०२४ च्या राष्ट्रीय निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास नसल्यामुळे इतर पक्षांमध्ये त्यांचे वेगळेच इंजिनिअरिंग सुरू आहेे, असे बघेल यांनी नमूद केले.