नगर -नगरच्या वाडिया पार्क मैदानामध्ये येत्या 27, 28 व 29 मे रोजी छत्रपती शिवराय राज्यस्तरीय निमंत्रित कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 800 हून अधिक मल्ल सहभागी होणार असून चांदीच्या गदेसह साडेसोळा लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे मल्लांना दिली जाणार आहेत. पुरुष मल्लांबरोबरच महिला मल्लांच्या देखील स्वतंत्र कुस्त्यांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्पर्धेचे स्वागताध्यक्ष तथा शहर जिल्हा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे व जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै.वैभव लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
काळे पुढे म्हणाले की, 27 मे रोजी स्पर्धकांची नोंदणी तसेच अन्य तांत्रिक प्रक्रिया पार पडतील. 28 मे रोजी सकाळी 11.00 वाजता हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध यांच्यासह सर्व धर्मिय धर्मगुरूंच्या तसेच वारकरी संप्रदायातील महानुभावांच्या व शहरासह जिल्ह्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचे उद्घाटन होईल.
29 मेला सायंकाळी 5.00 वाजता पार पडणाऱ्या अंतिम सामन्यांसाठी आणि बक्षीस वितरण समारंभासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, क्रीडा मंत्री सुनील केदार, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ.डॉ. सुधीर तांबे, एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्री थोरात, शरयु देशमुख, महानंदाचे चेअरमन रणजीत देशमुख, कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, अर्जुनवीर पुरस्कार विजेते पै. काकासाहेब पवार, राज्य उपाध्यक्ष पै. अमृत भोसले, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख, पदाधिकारी, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी आदींची उपस्थिती असणार आहे.
लांडगे म्हणाले की, पुरुष स्पर्धांच्या ओपन गटामध्ये 84 ते 120 किलो पर्यंतचे मल्ल खेळू शकणार आहेत. या गटासाठी प्रथम पारितोषिक 5 लाख व चांदीची गदा, द्वितीयसाठी 2 लाख व चषक तर तृतीयसाठी 50 हजार दिले जाणार आहेत. 57 किलो, 65 किलो, 74 किलो या तीन वजन गटासाठी प्रत्येकी प्रथम पारितोषिक 75 हजार, द्वितीय 50 हजार तर तृतीय 10 हजार आहे. 84 किलो वजन गटासाठी प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय 50 हजार तर तृतीय 11 हजारचे आहे. महिला स्पर्धांमध्ये 53 किलो वजन गटासाठी प्रथम पारितोषिक 30 हजारचे तर द्वितीय पारितोषिक 25 हजारचे असणार आहे. 57 किलो वजन गटासाठी प्रथम पारितोषिक 75 हजारचे तर द्वितीय पारितोषिक 40 हजारचे असणार आहे. 65 किलो वजन गटासाठी चांदीची गदा व 1 लाखाचे प्रथम पारितोषिक देण्यात येणार असून द्वितीय पारितोषिक 50 हजारचे असणार आहे.