21 वर्षीय मल्याळी मॉडेल व अभिनेत्रीचा तिच्या 21व्या वाढदिवसीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मॉडेल सुहाना राहत्या घरात कोळिकोडे येथे मृतावस्थेत आढळून आला आहे. सुहानाचा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. पतीकडून तिचा छळ होत असल्याचा आरोप करत त्यानेच तिची हत्या केली असल्याचा आरोप सुहानाच्या आईने केला आहे.
माझी मुलगी कधीही आत्महत्या करू शकत नाही. तिचा खून करण्यात आला आहे. ती माझ्याकडे तक्रार करायची की, पती तिला मारझोड करतो तसेच पुरेसे खायलाही देत नाही. तिचा छळ केला जायचा. पोलिसांनी याचा तपास करून आम्हाला न्याय द्यावा. असे आरोप सुहानाच्या आईने केले असून त्याच्या विरोधात पोलीसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलीसांनी पती सज्जात याला ताब्यात घेतले आहे.
सुहाना व सज्जात यांचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. सज्जात पूर्वी कतारमध्ये नोकरी करत होता. आता मात्र तो बेराजगार आहे. तो सुहानाकडे सतत पैशांवरून वाद घालत होता. अभिनयासाठी मिळणाऱ्या पैशावरून या दोघांचे नेहमी खटके उडत होते. असे तपास करणाऱ्या पोलीसांनी माहिती देताना सांगितले आहे. सज्जातने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. त्याने दावा केला आहे की, ती त्याला स्नानगृहात मृतावस्थेत आढळली. हे पती-पत्नी राहात असलेल्या घराच्या मालकाने सांगितले की, सज्जातच्या हाका ऐकून मी तेथे गेलो असता मला ती त्याच्या मांडीवर दिसून आली. ती कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे त्याने सांगितले. आम्ही पोलिसांना कळवल्यावर ते तेथे पोहोचले. मात्र हे प्रकरण आत्महत्येचे आहे की खुनाचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.