नवी दिल्ली – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या विधानामुळे राज्यात मोठे वादंग निर्माण झाले आहे. त्यांनी महाराजांची तुलना कथितपणे गडकरी यांच्याशी केल्यामुळे संतापाची लाट आहे.
विरोधकांनी तर राज्यपालांना लक्ष्य केलेच आहे, आता राज्यात भारतीय जनता पार्टीचा सहकारी असलेल्या शिंदे गटाच्या एका आमदारानेही राज्यापालांवर टीका केली आहे. या घडमोडीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वत: पुढे आले असून त्यांनी झालेले नुकसान कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी देव आहेत. आमच्या आई-वडिलांपेक्षाही शिवाजी महाराजांच्या प्रती आमची अधिक निष्ठा आहे. त्यांचे जिवनच आमच्यासाठी आदर्श आहे. ते यशस्वी, किर्तीवान, सामर्थ्यवान जाणते राजे होते. दृढसंकल्पाचे महामेरू, श्रीमंत योगी होते. ते डीएड ,बीएड करणारे राजे नव्हते तर वेळ पडल्यास आपल्या मुलालाही कठोर शिक्षा करणारे राजे होते. शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत ” असे भावनिक उदगारही त्यांनी काढले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत. pic.twitter.com/QOe2l7A7tM
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) November 21, 2022
गडकरी यांच्या कार्यालयीन ट्वीटर हॅंडलवरूनही याबाबतचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. त्यात त्यांनी अत्यंत भावूक स्वरात महाराजांबद्दल आपली भूमिका मांडली आहे.