पुणे – शहराचे पूर्वेकडील प्रवेशद्वार पुणे (भैरोबानाला) सोलापूर रस्त्यावर मांजरी गाव हद्दीपर्यंत सुमारे 6 किलोमीटर रस्ता आहे. त्यावर तब्बल 35 ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण करणाऱ्या समस्या आहेत. या रस्त्यावर सरासरी प्रत्येक 166 मीटर अंतरावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी, अपघातांची संख्या वाढली आहे.
पुणे-सोलापूर रस्त्यावरील कोंडीची तक्रार केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत करण्यात आली आहे. याबाबत स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी, सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि नागरिकांनी वाहतूक कोंडी, तसेच अपघातांच्या तक्रारी केल्या जात आहेत.
त्यावर महापालिका, प्रादेशिक परिवहन कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, सल्लागार तसेच वाहतूक पोलिसांनी भैरोबा नाला ते मांजरी तसेच पुढे उरुळी कांचनपर्यंत सोलापूर रस्त्याची पाहणी दि. 10 ऑगस्ट रोजी केली. यात मनपा हद्दीत 6 किलोमीटर अंतरात 35 ठिकाणी, तर उरुळी कांचनपर्यंत आणखी 9 ठिकाणी कोंडी होत आहे. या समस्या दूर करण्यासाठी उपाययोजनांचे पत्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने महापालिकेस नुकतेच दिले आहे.
फातिमानगर चौक : अतिक्रमणे काढणे. प्रतीक एन्टरप्रायजेसपर्यंत रस्ता समतल करणे. चौकात कॉर्नरला चॅम्पर करणे. रस्त्याचे रेलिंग दुरुस्ती.
सावतामाळी मित्रमंडळ : पदपथामुळे कोंडी होत असल्याने तो काढणे
वानवडी कार बाजार : मगरपट्टा चौकापर्यंत पदपथावरील वाहने हटवून रस्ता उपलब्ध करणे
93 अवेन्यू मॉल – बीआरटी बस थांबे रस्त्याकडेला घेणे. बी.टी. कवडे रस्त्याकडे जाताना चॅम्पर बसविणे, विरुद्धद दिशेने येणारी वाहने थांबवणे, अर्धवट कामे पूर्ण करणे, कवडे रस्ता बसथांबा पुढे घेणे
काळूबाई मंदिर चौक – मेडियन मध्यभागी घेणे. मध्यभागी असलेल्या झाडांचे स्थालांतर करणे
“एआयपीटी’ : पदथदिवे बाजूला घेणे
रामटेकडी चौक : बीआरटी बसथांबा बाजूला घेणे. रस्त्याकडेला ट्रान्सफार्मर, पुलावरील अतिक्रमणे हटविणे
वैदुवाडी- बीआरटी बस थांबे कडेला घेणे
रायफल शुटिंग रेंज : वापर होत नसल्याने सायकल ट्रॅक काढणे
पुणे-सोलापूर रस्ता : दोन्ही बाजूंस तीन लेन विकसित करणे
गाडीतळ – पूल सुरू होण्यापूर्वी रस्त्यात येणारी झाडे काढणे. नो पार्किंगचे फलक लावणे. पुलाखालील विक्रेत्यांचे स्थलांतर करणे
15 नंबर हडपसर : खासगी बसथांबा बंद करणे. फूटपाथवरील पार्किंग बंद करणे
मांजरी फाटा : चौकातील सर्व अतिक्रमणे हटवणे, रम्बलर, झेब्रा क्रॉसिंग