मुंबई – हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून चांगलाच वाद सुरु झाला.अभाजपाने ठीक ठिकाणी रस्त्यावर उतरत याविरोधात जोरदार आंदोलने केली. यानंतर आता ठाकरे गटाने सामानातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी राज्यपालांनी केलेल्या विधानाची आठवण देखील सत्ताधाऱ्यांना सामनातून करून देण्यात आली आहे. आधी शिवराय अपमानप्रकरणी राज्यपालांना हटवण्याची मागणी करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे तारतम्य बाळगणार आहेत काय? असा सवाल सामानातून उपस्थित करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या राजकीय, आर्थिक, धार्मिक धोरणांवर छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो. त्याच स्वराज्य रक्षणासाठी संभाजीराजांनी इतिहासातील सगळय़ात मोठा त्याग व बलिदान केले. एखादा तपस्वी व धर्मवीरच असे बलिदान करू शकतो. त्या धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज सत्तेवर आहेत, राजभवनात ठाण मांडून बसले आहेत अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. तसेच त्यांना पाठीशी घालणारे अण्णाजी पंतांचे समर्थक अजित पवारांना तारतम्य बाळगण्याचा सल्ला देतात हीच खरी गंमत आहे. आधी शिवराय अपमानप्रकरणी राज्यपालांना हटवण्याची मागणी करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे तारतम्य बाळगणार आहेत काय ? असा जाब देखील यावेळी विचारला आहे.
“संभाजीराजांचे बलिदान हे धर्मासाठीच होते याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही, पण छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केले त्या स्वराज्य रक्षणासाठीही छत्रपती संभाजीराजेंनी त्याग आणि बलिदान केले. अजित पवार म्हणतात, ‘‘छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक होते. धर्मवीर नव्हते.’’ आम्ही म्हणतो, खरा धर्मवीरच स्वराज्याचा रक्षक असतो. तेव्हा त्यात उगाच श्लेष काढून कोणाला छाती पिटण्याची गरज नाही”. असं स्पष्ट मत सामनातून व्यक्त करण्यात आलं आहे.
“महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा अपमान राज्यपाल कोश्यारी व भाजपच्या अनेक पुढाऱ्यांनी केला तेव्हा ‘‘राज्यपाल, तारतम्य बाळगा !’’ असे सांगण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांना झाली नाही. कुणी शिवरायांना ‘माफीवीर’ म्हणाले, तर कुणी ‘इतिहासातील जुने नेते’ म्हणून शिवरायांची चेष्टा केली. हे काय तारतम्यास धरून होते? राज्यपालांनी शिवरायांचा अपमान करूनही ते राजभवनाची हवा खात बसले आहेत. राज्यपालांविरुद्ध राज्यात संतापाचा उद्रेक झाला, महाविकास आघाडीने विराट मोर्चा काढला. यावर कोणतेही तारतम्य न बाळगता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘हा नॅनो मोर्चा आहे’ अशी त्याची संभावना केली. वास्तविक, हा मोर्चा शिवरायांच्या अपमानाविरुद्ध होता याचे तारतम्य तरी फडणवीस यांनी बाळगायला हवे होते. शिवराय हेसुद्धा हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणजे धर्मवीरच होते व त्यांचाच वारसा म्हणजे संभाजीराजांनी पुढे चालवला.” असाही सामनातून म्हंटल आहे.
अण्णाजी पंतांचा दाखल देत टीका
“संभाजीराजांना स्वराज्यापासून व पित्यापासून तोडण्याचे मोठे कारस्थान त्या काळात रचले गेले. त्या कारस्थानाचे सूत्रधार अण्णाजी पंत होते व त्याच अण्णाजी पंतांचे वारसदार आज महाराष्ट्रविरोधी कारस्थानात सामील आहेत. संभाजीराजांना स्वराज्य व धर्मरक्षणासाठी शेवटी हौतात्म्य पत्करावे लागले. त्यांनी यातना सहन केल्या, मरण पत्करले; पण मोगलांशी तडजोड केली नाही. त्यामुळे स्वराज्य व धर्मरक्षणासाठी संभाजीराजांनी केलेला त्याग व शौर्याचे वर्णन करावयास शब्द नाहीत. हा शौर्याचा व धर्मरक्षणाचा वारसा संभाजीराजांनी आपल्या राजश्री आबासाहेबांकडून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतला.”
दि. 6 जानेवारी 1681 रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोपाळ भट अग्निहोत्री महाबळेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे. संभाजीराजे म्हणतात, ‘‘राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हांस अगत्य.’’ याचा अर्थ सरळ स्पष्ट आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या राजकीय, आर्थिक, धार्मिक धोरणांवर छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो. त्याच स्वराज्य रक्षणासाठी संभाजीराजांनी इतिहासातील सगळय़ात मोठा त्याग व बलिदान केले. एखादा तपस्वी व धर्मवीरच असे बलिदान करू शकतो. त्या धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज सत्तेवर आहेत, राजभवनात ठाण मांडून बसले आहेत. त्यांना पाठीशी घालणारे अण्णाजी पंतांचे समर्थक अजित पवारांना तारतम्य बाळगण्याचा सल्ला देतात हीच खरी गंमत आहे. आधी शिवराय अपमानप्रकरणी राज्यपालांना हटवण्याची मागणी करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे तारतम्य बाळगणार आहेत काय? असा जळजळीत सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.