Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांनीसडकून टीका केली. संजय गायकवाड यांनी तर छगन भुजबळ यांना “त्यांच्या कमरेत लाथ घालून बाहेर काढा”, असेही धक्कादायक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे.
छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी, “माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला आहे. तसा तो आमदारांनाही आहेच. त्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही. पण संजय गायकवाड यांनी राजीनामा मागताना जी भाषा वापरली, ती बरोबर नाही. संजय गायकवाड शिवसेनेत आहेत. त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही ज्या शिवसेनेच्या शैक्षणिक संस्थेत शिकत आहात. त्या संस्थेतील मी वरिष्ठ प्राध्यापक होतो. भाषा जरा जपून वापरायला पाहीजे. त्याबद्दल त्यांचे नेते एकनाथ शिंदे हे पाहतील.” असे म्हटले.
पुढे छगन भुजबळ यांनी,“कमरेत लाथ घालून मला बाहेर काढण्याची भाषा वापरली असली तरी मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचा किंवा ठेवण्याचा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा आहे. राहिला प्रश्न कमरेत लाथ घालण्याचा तर मला असं वाटतं की ते असं करणार नाहीत. कारण त्यांचे स्व. आनंद दिघे आणि त्यांचे सहकारी आमदार मो. दा. जोशी यांच्याबरोबर मी काम करत होतो. त्यामुळे त्यांनाही कल्पना आहे की, अशी लाथ घालणं किंवा अशाप्रकारची भाषा करणे, हे योग्य नाही”, असा सूचक इशाराच छगन भुजबळ यांनी दिला आहे.
त्यासोबतच छगन भुजबळ यांनी,”संजय गायकवाड यांचे मी काय वाकडे केले, हेच मला कळत नाही. मी त्यांना कधी भेटलेलोही नाही. ते त्यांच्या समाजाची मागणी करत आहेत. मी माझ्या ओबीसी वर्गाची मागणी पुढे करत आहेत. यामध्ये त्यांनी वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही.” असे म्हणत त्यांनी त्यांच्यावर टीका केली.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काल छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले होते. “छगन भुजबळ हे मराठा समाजाच्याविरोधात तिरस्काराची भावना ठेवून बोलत आहेत. हे योग्य नाही, अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवता कामा नये, त्यांची हकालपट्टी करावी. मंत्रिपद घेताना सर्वांना समान न्याय देण्याची शपथ घेतली जाते, अशावेळी भुजबळ एका समाजाचा तिरस्कार कसा काय करू शकतात?”, असा प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित करत टीका केली. त्यांच्या याच टीकेला आता छगन भुजबळ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.