दुबई –आयपीएल स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर बेंगळुरू व चेन्नई सुपर किंग्ज हे दोन संघ भिडले. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत विजयासाठी ठेवलेले १४७ धावांचे आव्हान पुणेकर ऋतुराज गायकवाड याच्या ६५ धावांच्या खेळीमुळे चेन्नईने आरामात पार केले.
तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार विराट कोहलीने ४३ चेंडूत सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. तर ए बी डिव्हिलियर्सने संघाच्या धावसंख्येत ३९ धावांची भर घातली. निर्धारित २० षटकांमध्ये बंगळुरूचा डाव ६ गड्यांच्या मोबदल्यात १४६ धावांवर आटोपला.
चैन्नईच्या सॅम करनने ४ षटकांमध्ये अवघ्या १९ धावा देत ३ गडी टिपले तर दीपक चहरने ४ षटकांमध्ये २ बळी घेत ३१ धाव दिल्या. मिशेल सँटनरने देखील टिच्चून गोलंदाजी करत ४ षटकांच्या स्पेलमध्ये अवघ्या २३ धावा दिल्या. त्याने १ विकेटही टिपली.
यानंतर १४७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या धोनी सेनेला आंबटी रायडू व फाफ डू प्लेसिसच्या रूपात दोन झटके बसले. मात्र पुणेकर ऋतुराज गायकवाडने धावांचा वेग संतुलित ठेवत ५१ चेंडूत ६५ धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीमुळे चेन्नईने हा सामना १८.४ षटकांमध्ये २ गडी गमावत सहज खिशात घातला.
बंगळुरूतर्फे युझवेन्द्र चहल व क्रिस मॉरिस यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.