दुबई – अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जच्या सुरेश रैनाची कामगिरी पाहता तो अत्यंत निराशा करत आहे. त्याला वारंवार संधी देण्यापेक्षा नवोदितांना स्थान द्यावे व रैनाची संघातून हकालपट्टी करावी, अशी टोकाची टीका माजी कसोटी क्रिकेटपटू व वादग्रस्त समालोचक संजय मांजरेकर यांनी केली आहे. त्यांच्या या टीकेवर चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला असून, त्यांनी मांजरेकरांनाच ट्रोल केले आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत चेन्नईचा संघ सरस कामगिरी करत असून, गुणतालिकेत 9 पैकी 7 सामन्यांत विजय मिळवत त्यांनी दुसरे स्थान मिळवले आहे. मात्र, चेन्नईचा आयपीएल स्पर्धेतील सर्वांत महत्त्वाचा खेळाडू रैना मात्र सातत्याने अपयशी ठरत असूनही त्याला वारंवार स्थान का देण्यात येते. खरेतर त्याची कामगिरी अत्यंत बेजबाबदार होत असून, त्याला कामगिरीचे कोणतेही गांभीर्य दिसून येत नाही, असे मांजरेकर यांनी सांगितले आहे.
रैना आणि अंबाती रायुडू यांची सुमार कामगिरी चेन्नई संघाला नुकसानकारक ठरत आहे. मात्र, केवळ कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्याशी मैत्री असल्यामुळेच त्यांचे संघातील स्थान टिकत आहे.
रैनाचा खराब फॉर्म व रायुडूची निराशाजनक कामगिरी ही चेन्नई संघाची डोकेदुखी ठरत आहे. रायुडूला आणखी संधी द्यायला हरकत नाही; पण रैनाला संघातून बाहेर काढावे, असे मतही मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे.