पुणे – दारूच्या नशेत भर रस्त्यात गोंधळ घालणाऱ्या तरुणाला समजावण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरच या मद्यपीने हल्ला केल्याची घटना घडली. त्याने कर्मचाऱ्याच्या डोक्यात वीट घालून त्यांना जखमी केले आहे. याप्रकरणी केशवन बसवराज कांबळे (वय २५, रा. पांडवनगर) याला अटक केली आहे. पोलीस नाईक महेंद्र करगळ (वय ३८) हे जखमी झाले आहेत. चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात नेमणूकीस आहेत. त्यांना पांडवनगर पोलीस चौकीत कर्तव्य देण्यात आलेले आहे. दरम्यान, ते कर्तव्यावर असताना चौकीसमोरच कांबळे हा दारू किंवा त्यासारख्याच अमली पदार्थाचे सेवन करून गोंधळ घालत होता. त्यामुळे तक्रारदार महेंद्र करगळ यांनी त्याला त्याला समजावून सांगत गोंधळ घालू नको, असे सांगितले.
याचा राग आल्याने त्याने महेंद्र यांनाच शिवीगाळ केली आणि प्लास्टिकची खुर्ची उचलून अंगावर धावून गेला. त्याला पकडून पोलीस चौकीच्या बाहेर आणले. त्यावेळी त्याने बाजूला पडलेली विट उचलून महेंद्र करगळ यांच्या डोक्यात घालत त्यांना जखमी केले. अधिक तपास चतुश्रृंगी पोलीस करत आहेत.