पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे पोलिसांनी ड्रग्स तस्करांवर मोठी कारवाई करत त्यांचे कंबरडे मोडल्याची घटना ताजी असतानाच आता शहरात रसायनमिश्रित ताडी तयार करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. ताडीसाठी केमिकल पुरवठा करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील एक कारखाना पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे.
या कारवाईत पुणे पोलिसांनी तब्बल दोन हजार तीनशे किलो क्लोरल हायड्रेट पावडर (केमिकल) जप्त केले आहे. त्याची किंमत ६० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. पोलिसांनी काही उपकरणे देखील जप्त केली आहे. गंभीर बाब म्हणजे सातवी पास असलेली व्यक्ती हा कारखाना चालवित होती.
नीलेश विलास बांगर (वय ४०, रा- पिंपळगाव खडकी, कुरकुटे मळा, मंचर), प्रल्हाद रंगनाथ भंडारी (वय ६१, रा केशवनगर, मुंढवा) या दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पुण्यात बनावट ताडी तयार करण्यासाठी लागणारे केमिकल विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. प्रल्हाद भंडारी याच्याकडे बनावट ताडीसाठी लागणारा क्लोरल हायड्रेटचा साठा सापडला. त्याची कसून चौकशी केली असता. हा माल नीलेश बांगरने पुरवल्याचे पुढे आले.
पुणे पोलिसांनी पिंपळगाव खडकी येथील त्याच्या घरावर छापा टाकून केमिकलचे १४२ किलो ७५० ग्रॅम वजनाची ५ पोती जप्त केली. त्याची चौकशी केली असता, संगमनेर येथील वेल्हाळे येथे बांगरने क्लोरल हायड्रेड पावडर तयार करण्याचा अवैध कारखाना थाटल्याचे पुढे आले.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला. त्या वेळी २ हजार २१७.५ किलो तयार क्लोरल हायड्रेड आणि ते तयार करण्यासाठी लागणारी उपकरणे असा ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हा अवैध कारखाना सील केला.