पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मार्चअखेरीस तापलेल्या उन्हामुळे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात उच्चांकी 43.2 अंश सेल्सिअस, तर पुणे शहरात वडगावशेरी येथे सर्वाधिक 41.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दिवसभर सूर्य आग ओकत असल्याने अंगाची लाहीलाही झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील तापमान पाहता विदर्भापेक्षा पुणे अधिक तापल्याचे दिसून येते.
एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा वाढणारा चटका यंदा मार्च महिन्यात पुणेकर अनुभवत आहे. मार्च महिन्यात शहरातील सरासरी कमाल तापमान 39 अंशांच्या आसपास असते. तर एप्रिल आणि मेमध्ये ते ४१ अंशापर्यंत जाते. मात्र, यंदा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच कमाल तापमानात वाढ होण्यास सुरवात झाली. त्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यातील अवकाळी पावसामुळे कमाल तापमान 35 अंशाच्या खाली गेले आहे.
यंदा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्याने कमाल तापमानाने 42 अंशापर्यंत मजल मारली. पुढील दोन दिवस कमाल तापमानात एक ते दोन अंशाने वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील उन्हाचा चटका आणखीन वाढणार. नागरिकांनी उष्माघातापासून वाचण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. दुपारच्या वेळी घराबाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे असा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.
चौकटशहरासह जिल्ह्यातील कमाल तापमान
शिरूर – 43.2, वडगावशेरी – 41.8, कोरेगाव पार्क – 41.7, राजगुरूनगर – 41.3, लवळे – 40.8, हडपसर आणि दौंड – 40.4, पुरंदर आणि मगरपट्टा – 40.3, तळेगाव – 40, पाषाण – 39.6, शिवाजीनगर आणि एनडी – 39.5, इंदापूर 39.1, आंबेगाव – 38.6, बारामती – 38.4, हवेली – 37.7, भोर – 37.2, लवासा – 35.8, लोणावळा – 35