नवी दिल्ली : देशात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या ब्रिजभूषण प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी आता या प्रकरणात कारवाई करत महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीवरून ब्रिजभूषण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ब्रिजभूषण यांना लवकरच शिक्षा होईल, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.
कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण चरण सिंग यांच्यावर देशातील काही महिला कुस्तीपट्टूंनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. हे आरोप झाल्यानंतरही ब्रिजभूषण यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे संतापलेल्या कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर २ महिन्याच्या वर धरणे धरले होते. यामध्ये साक्षी मलिक, बजरंग पुनियासह देशातील अनेक खेळाडू सहभागी झाले होते. दोन महिने चाललेल्या या धरणे आंदोलनाला अखेर यश मिळाले असून ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल झाले आहे.
ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दखल करण्यात आलेल्या गुन्हयांमुळे त्यांना ५ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे. ब्रिजभूषण यांच्याविरोधात चार्जशीट दाखल झाल्याने त्यांना आता सुनावणीसाठी बोलावले जाऊ शकते. त्यासोबत, या चार्जशीटमध्ये ज्या साक्षीदारांची नावे आहेत, त्यांनाही बोलावले जाणार आहे, असं आरोपपत्रात म्हटलं आहे. तर, सुनावणीअंती ब्रिजभूषण यांना शिक्षाही सुनावली जाईल, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.
ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांनी १०८ साक्षीदारांची चौकशी केली. यामध्ये कुस्तीपटू, प्रशिक्षक यांच्यासह १५ जणांनी जबाब नोंदवला आहे.